दिल्लीत आढळला मंकीपॅाक्सचा रुग्ण
नवी दिल्लीः देशात मंकीपॉक्स रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळून आलाय. त्यामुळे आतापर्यंत देशात या रोगाचे चार रुग्ण झालेत.
या रुग्णाला परदेशीवारीचा इतिहास नाही. तो हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे एका पार्टीसाठी गेला होता, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.
हा रुग्ण पश्चिम दिल्लीतील रहिवासी असून, त्याला मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तीन दिवसांपूर्वीच त्याला मंकीपॉक्सची लक्षणे दिसून येत होती. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यात हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यापूर्वी केरळमध्ये मंकीपॉक्सची तीन रुग्ण आढळून आले आहेत.
जगात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या व्यक्तीच्या थेट संपर्कातून दुसऱ्या व्यक्तीला या रोगाची लागण होत आहे. त्यामुळे जगभरात दक्षता घेण्यात येत आहे.जगभरातील 75 राष्ट्रांमध्ये या रोगाचा प्रसार झाला आहे. आतापर्यंत 16 हजार रुग्ण आढळून आले. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली.