मंठा तालुक्यात सोयाबीनला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका
१११ मी. मी पाऊस : कपाशीसह भाजीपाल्याचे नुकसान
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी, उस्वद व शिरपूर या सज्जातील १० गावांतील सोयाबीन, कापूस व इतर पिकांना १९ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत अंदाजे ७० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे तलाठ्यांच्या अंदाजे प्राथमिक अहवालातून समोर आले . तळणीसह शिरपूर व उस्वद सज्जातील देवठाणा, वडगाव सरहद्द, कानडी, आदवाडी, कोकरबा, टाकळखोपा व इंचा गावांतील ५ हजार ३३० हेक्टर वरील सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर ५५३ हेक्टर वरील कापूस व ८१ हेक्टर वरील इतर पिकांसह भाजीपाला व फळबागांना अतिवृष्टीचा फटाका बसला आहे. ही बाब उस्वदचे तलाठी नितीन चिंचोले यांनी २० सप्टेंबर रोजी सादर केलेल्या अंदाजे प्राथमिक अहवालातून स्पष्ट केले आहे.
दुधा व वझर सरकटे सज्जातील गावांतही पिकांचे मोठे नुकसान …
१९ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत दुधा व वझर सरकटे सज्जातील सासखेडा, लिबखेडा, हनवतखेडा, किर्ला, जाभरुन, तुपा, पोखरी केधळे, भुवन, वाघाळा या गावांतील पिकांचे अंदाजे ७० टक्के नुकसान झाल्याचे दुधा सज्जाचे तलाठी एम पी सांगळे व वझर सरकटे सज्जाचे तलाठी श्रीहरी मुरुकूट यांनी सांगितले.
सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव :
मंठा तालुक्यातील जयपूर मंडळात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडुन शेंगा सुकून गळ होत आहे. यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. या संदर्भात जयपूर (ता . मंठा) येथील ज्ञानदेव दत्तात्रय काकडे व शिवाजी गणेशराव काकडे यांनी ( ता. २६ ) रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे …
मंठा तालुक्यातील तळणीसह जयपुर मंडळात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनीही पिकविमा कंपनीना नुकसान भरपाई देण्यास भाग पाडावे, असेही निवेदनात म्हटले आहे.