कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ महसूल मंडळात राहतोय हे आमचं चुकतं का
अतिवृष्टीतून वगळले : नुकसान यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
कुंभार पिंपळगाव :प्रतिनिधी
गतवर्षी खरीप हंगामातील अतिवृष्टीत कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ महसूल मंडळातील शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले होते. परंतु, शासकीय किचकट निकषांमध्ये हे नुकसान बसत नसल्याचे कारण पुढे करीत या महसूल मंडळांना नुकसान अनुदानातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ महसूल मंडळात राहतोय हे आमचं चुकतं का असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
सन २०२२ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले आहे. परंतु जांबसमर्थ व कुंभार पिंपळगाव या दोन मंडळांना या अतिवृष्टीग्रस्त मंडळाच्या यादीतून वगळले आहे. त्यामुळे जांबसमर्थ, विरेगाव, विरेगाव तांडा, हातडी, बेलवाडी, घोन्सी बु, घोन्सी तांडा १ व २, कोठाळा, घानेगाव, भेंडाळा, भेंडाळा तांडा, गुणानाईक तांडा, साकळगाव, श्रीपत धामनगाव, लिंबी, सिंदखेड, देवी दहेगाव येथील शेतकरी तसेच कुंभार पिंपळगाव मंडळातील कुंभार पिंपळगाव, लिंबोणी, अरगडे गव्हाण, पाडुळी, मूर्ती, उक्कडगाव, शिवणगाव, राजुरकर कोठा, नागोबाची वाडी, राजाटाकळी, गुंज बु, भादली या गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळणार नाही. हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय असून, शासनाने हा अन्याय दूर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने या दोन्ही मंडळातील नुकसानग्रस्तांना तात्काळ अनुदान द्यावे. शेतकऱ्यांना अनुदान न दिल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा अनिरूद्ध शिंदे, गटनेते यांनी दिला आहे