जालना जिल्हाब्रेकिंग बातम्यामराठावाडामहाराष्ट्र न्यूजसंपादकीयसांस्कृतिक बातम्या

दुनियाला गुलाम करायला निघालेल्या माणसाला त्या मोबाइलने कधी गुलाम करून घेतलं ते कळलंच नाही.

स्क्रोलमध्ये रोल होणारं आयुष्य …

images (60)
images (60)

प्रा. विशाल गरड

नकळत आपण सगळेच स्वतःच्या आयुष्याला स्क्रोलमध्ये रोल करत आहोत. मोबाइल नव्यानं मार्केटमध्ये आला होता, तेव्हा ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ अशी त्याची जाहिरात व्हायची पण दुनिया मुठ्ठी में करण्याच्या नादात उलट माणसाचं आयुष्यच त्या मोबाइलनं त्याच्या स्क्रीनमध्ये कैद करून घेतलं.दुनियाला गुलाम करायला निघालेल्या माणसाला त्या मोबाइलने कधी गुलाम करून घेतलं ते कळलंच नाही. सुरुवातीला अगदी क्षुल्लक धाग्याएवढ्या वाटणाऱ्या माणसाच्या सवयी जेव्हा साखळदंडाएवढ्या मोठ्या होतात, तेव्हा त्यापासून सुटका करून घेणे महाकठीण होते. मग ती सवय कोणतीही असू द्या, जर वेळेत आवर घातला तर ठीक नाहीतर तिचाच गुलाम म्हणून राहावे लागते.

रस्त्यानं सहज चालताना पाहिलं तरी आजूबाजूला उजव्या हाताच्या चार बोटांवर पकडलेला मोबाइल आणि मान वाकवून अंगठ्यानं स्क्रोल करणाऱ्या शेकडो व्यक्ती सहज निदर्शनास पडतील. कित्येक जण तर कानात हेडफोन घालून स्क्रोलिंग करत करत चारचाकी गाडी किंवा रेल्वेखाली रोलिंग होऊन थेट स्वर्गात जाऊन पोहोचलेत.

काहीतरी चांगलं दिसेल, वाचायला मिळेल हे सोडून एक सवयीचा भाग म्हणून आपण काही वेळ फेसबुकवर रेंगाळतो मग थोडा वेळ स्क्रोल करून तिथून बोअर झालेकी व्हॉट्सअॅपवर उडी मारतो तिथे काही चॅट बघून झाल्या की इन्स्टाग्रामवर जातो तिथेही स्क्रोलिंग आणि स्क्रोलिंगच करत राहतो मग पुन्हा फेसबुकडे वळतो मग पुन्हा व्हॉट्सअॅप आणि पुन्हा इन्स्टाग्राम.

या तीन डिजिटल ब्रह्मगुरुंनी आपल्या सगळ्यांना वेड लावून ठेवलंय. आपण त्यांच्या इतके आहारी गेलोत की कधी बॅटरी संपली तर असे वाटते पुढच्या पाच मिनिटांत ती चार्ज होऊन लगेच मोबाइल हातात यावा. काही जणांना तर तेवढापण दम निघत नाही ते लाइटच्या बोर्डजवळच मोबाइल चार्जिंग चालू असताना स्क्रोल करत राहतात.कधी कधी मी स्वतः अनुभवले आहे. वीरा घरकामात व्यस्त असताना माझी दिड वर्षाची लहान मुलगी शिवलक्ष्मीला माझ्याकडं खेळवण्यासाठी देते पण मी मात्र एखादी पोस्ट टाकल्यानंतर उत्सुकतेपोटी त्यावरील कमेंट वाचत वाचत आणि त्यांना रिप्लाय देत देत त्यात इतका गुरफटून जातो, की माझी लहान मुलगी मांडीवरून कधी उठून गेली याचेही भान नाही राहत.

त्यातूनच मग ती पायऱ्याकडं वगैरे चालली की वीराचा आवाज येतो “अहो, शिवलक्ष्मी पायऱ्याकडं येत आहे, घ्या ना तिला.” मी ताडकन भानावर येतो आणि तिला पळत जाऊन उचलतो. हे असं सर्रास सर्वांसोबतच होत आहे.स्क्रोलिंगचा आजार. हो आजारच म्हणेन मी त्याला, ज्याचा उपचार कोणालाही नकोय. कौतुकाच्या कमेंट वाचून डोपामाइन रिलिज होते आणि मेंदूमध्ये आनंद निर्माण होतो. त्या भावना मेंदूला पुन्हा पुन्हा हव्या हव्याशा वाटतात आणि आपणही मग त्याच्या शोधात मोबाइलमध्ये हरवून जातो.

जर स्क्रीनच्या स्क्रॉलिंगनं वीजनिर्मिती शक्य झाली तर आपल्या देशाला वीजनिर्मिती केंद्राची गरजच पडणार नाही इतका सोशल मीडियाचा वापर भारतात होतोय. एका पाहणीनुसार भारतीय लोकांचा सरासरी स्क्रीनटाइम सात तासांचा आहे.

जो तुलनेने अधिक आहे. स्थिरस्थावर झालेल्या लोकांचा विरंगुळा म्हणून ठीक आहे पण ज्या वयात काहीतरी बनायचे असते, अभ्यास करायचा असतो, एकाग्रता गरजेची असते, करिअर घडवायचे असते नेमके त्याच वयातील युवक-युवतींमध्ये मोबाइलचे सर्वाधिक व्यसन आहे.

स्क्रीनवर स्क्रोलिंग करता करता त्यांच्या आयुष्यातला घडण्याचा वेळ सुद्धा स्क्रोल होत चाललाय हे ते विसरूनकाही युवकांच्या गळ्यातले ब्लूटूथ हेडफोन म्हणजे जणू डिजिटल मंगळसूत्र झाले आहेत. मोबाइलच्या आणि त्यांच्या नात्याची जणू ती निशाणीच वाटावी. मोबाइलचे स्क्रोलिंग कमी होऊन पुस्तकांच्या पानांची चाळण वाढणे नव्या पिढीची खरी गरज आहे.

माझाही स्क्रीनटाइम रोज तीनचार तास होतो पण त्यातून माझ्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटसाठी काहीतरी चांगला व्हिडीओ कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न असतो. लाखो फॉलोअर्सच्या प्रतिक्रिया ते करायला भाग पाडतात. तसेच धसुडीला मिळणाऱ्या प्रतिक्रिया वाचून रोज नवनवीन विषयांवर लिहिण्यासाठी आपसूकच हातांची बोटे मोबाइलच्या डिजिटल की-पॅडवर फिरत राहतात. पण तेही एक प्रकारचे व्यसनच म्हणावे लागेल.

फक्त या व्यसनातून काहीतरी चांगली निर्मिती होते. ज्यात तो वेळ देणाऱ्याला आणि घालवणाऱ्या अशा दोघांचाही फायदा होतो. पण हल्ली फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात सोशल मीडियावर पसरत चाललेली अश्लीलता चिंतेचीबाब आहे. वेगवेगळी फिल्टर वापरून चेहऱ्यावर डिजिटल संस्कार करून खोटारडे मुखवटे दाखवून लाइक मिळवण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. यातून युवा पिढीने सुधारून राहायला हवे.

अवघ्या मिनिटभराच्या स्क्रोलिंगमध्ये शेकडो नवनवीन विषयांची पुसट माहिती आपल्या मेंदूवर आदळत असते. त्यालाही मग त्यावर विचार करायला वेळ नाही मिळत. अशा सवयीने मग आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित नाही करू शकत.

मन सैरभैर होऊन इकडे तिकडे सतत काहीतरी नवीन शोधत राहतं. स्वतःला ट्रेंडच्या हवाली करून लोक करतात म्हणून आपणही तेच करत राहतो त्यात इतरांपेक्षा वेगळे करण्याचे नावीन्य मारून टाकतो. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच मोबाइल, इंटरनेट आणि वाहन या आधुनिक मानवाच्या मूलभूत गरजा बनल्या आहेत.

आता ज्याचे त्याने ठरवायचंय की तंत्रज्ञानाच्या हातात स्वतःला सोपवायचंय की तंत्रज्ञानाला हाती धरून इतिहास
घडवायचाय. वयाच्या कोणत्या टप्प्यावर कोणत्या डिजिटल शस्त्रास्त्रांचा किती व कसा वापर करायचा हे भविष्यात ज्याला कळेल, तो डिजिटल युगातला यशस्वी व्यक्ती असेल आणि जो फक्त स्क्रोलिंग करीत राहील, तो मनोरंजनाच्या मायाजाळात गिळंकृत झालेला दिसेल.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!