जालना जिल्हाब्रेकिंग बातम्या

जिल्ह्यात खरीप हंगामात 6 लाख 29 हजार हेक्टरवर होणार पेरणी

images (60)
images (60)

 

जालना दि.3 : खरीप हंगामातील पेरण्या सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती मुंडे या बोलत होत्या. यावेळी खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुषकुमार नोपाणी, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मैत्रवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, विभागीय कृषी सहसंचालक पी.आर. देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामातील पेरणीचे प्रस्तावित क्षेत्राच्या प्रमाणात बियाणे रासायनिक खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तसेच पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येवू नये. पुरेसा पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यामध्ये व्यापक जनजागृती करावी. तसेच पीक पेरणीची योग्य पद्धत, बियाणांची निवड आणि पेरणीपूर्व प्रक्रिया, पेरणीचा योग्य कालावधी आदीबाबतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्र पोहोचविण्यासाठी क्षेत्रिय कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी समन्वय ठेवावा. शेतक-यांना विविध पिकांच्या पेरणीची योग्य वेळ आणि पद्धत, त्या पिकांवर येणारे रोग आणि त्याअनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवावी. जमिनीची उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल यासाठी प्रयत्न करावा.  जिल्ह्यात बोगस बियाणे आणि रासायनीक खतांची विक्री होवू नये, यासाठी पथके स्थापन करुन, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होताच पंचनामे करुन बियाणे नमुने तपासण्यापेक्षा बियाणे पुरवठादारांकडील साठे तपासून त्याचवेळी त्याची गुणवत्ता तपासावी. तसेच जादा दराने खत विक्री करणे, खतांचा साठा करून ठेवणे, असे अवैध काम करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी व त्यांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच खरिप हंगामाकरीता शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून होणारे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट हे जून पर्यंत पूर्ण करावे. शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लावू नये याची दक्षता घ्यावी. तसेच पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान कुसुम योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाचा लाभ वेळेत मिळावा यासाठी नियोजन करावे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत लाभ देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी संबंधीतांना दिल्या.

तसेच जिल्ह्यातील ज्या गावातून टँकरची मागणी होताच, त्या गावास तात्काळ पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच टँकर, पुरक नळ योजना, विहिर अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देश ही पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले.

            जिल्ह्यात 6 लाख 29 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीसाठी नियोजन आज सादर करण्यात आले. त्यात सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजेच 2 लाख 21 हजार हेक्टरवर सोयाबीन तर 2 लाख 91 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. कापूस आणि सोयबीन पिकासाठी बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. जिल्ह्यात कापूस पिकाच्या नियोजित क्षेत्रावर पेरणीसाठी बियाण्यांची 11 लाख 51 हजार पाकिटे लागणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून, सोयाबीन पिकासाठी 65 टक्के घरच्या बियाण्यांचा वापर होणार आहे. तसेच उर्वरीत 35 टक्के म्हणजे 57 हजार 565 क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सोबतच खरीप ज्वारी, मुग, तूर, उडीद, भुईमूग, सूर्यफुल, तीळ या पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व पिकांच्या लागवडीसाठी 73 हजार 076 क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून, त्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच खरिप हंगामाकरीता आवश्यक व अपेक्षित बियाणे, खते, किटकनाशके यांचे योग्य नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आल्याचे यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!