संपादकीय

….महानतेचा मानदंड छत्रपती शिवराय

images (60)
images (60)

महानतेचा मानदंड छत्रपती शिवराय यांना भारत भूमीवर इ.स.730 पासून चे अत्यंत अत्याचारी हिंस्र प्रवृत्तीची परकीय आक्रमणे, उत्तरेतील सुमारे 650 वर्षांची परकीयांची गुलामी, दक्षिणेला विजयनगर अपवाद वगळता 350 वर्षाची गुलामी, 1565 मध्ये झालेले तालिकोटचे युद्ध आणि त्यानंतर पुन्हा स्थानिक सत्ताधीश निर्माण होऊ नये म्हणून परकियांनी केलेला बर्बरता पूर्वक व्यवहार या अत्यंतिक प्रतिकूलतेतून म्हणजेच राखेतून फिनिक्स पक्षी निर्माण व्हावेत तसे प्रचंड भयान काळोखातून इ.स.1630 मध्ये शिवरायांचा जन्म झाला. या बाळराजांनी सर्व प्रतिकूलतेवर मात करत हिंदवी स्वराज्याची, सांस्कृतिक पुनरुत्थानाची आपल्या राष्ट्रात मुहूर्तमेंढ रोवली.

म्हणूनच विख्यात कवयित्री पद्मा गोळे यांच्या शब्दांचा आधार घेत 'या अंधारी दिशादिशांवर प्रकाश फेकीत येसी महानतेचा मानदंड तू या राष्ट्री अवतरसी'* असे म्हणावेसे वाटते. कारण जेव्हा-जेव्हा आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करू तेव्हा-तेव्हा त्यातील जबरदस्त प्रेरणादायक व्यक्तिमत्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आठवू. आज प्रत्येकालाच मोठं व्हायचं, यशस्वी व्हायचं, नाव करायचं, पण किती लोकांना हे जमतं ? नेमकं कुठे चुकतं ? हे समजून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे

आणि जगून बघितला पाहिजे. आपण आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची कार्ये करणारे नागरिक पाहतो. काही लोक हाती घेतलेले काम मनापासून करतात, योग्य दिशेने कष्ट करतात, मेहनत करतात, त्यासाठी अपेक्षित नवीन शिकून घेतात व आपल्या कामातून आपली ओळख जगाला करून देतात.

मनापासून व आवडीने काम करत असल्याने बारा ते पंधरा तास काम केले तरी त्यांना थकवा येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा या वर्गाला ते सर्व मिळते जे इतरांसाठी स्वप्न असते. अशी माणसे देशाच्या प्रगतीलाही पूरक ठरतात. दुसरा प्रकार म्हणजे कामे टाळणारी, त्यासाठी पळवाट शोधणारी, कारणं शोधणारी, 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' या प्रवृत्तीची, इतर काही कौटुंबिक सामाजिक धार्मिक वैयक्तिक कारणे दाखवून कामापासून सुटका करून घेण्यासाठी सतत निमित्त शोधणारी, हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणारी ही माणसे जीवनात अयशस्वी होण्याची दाट शक्यता असते कारण हाती असलेलं काम ते मनापासून करत नाही.

अशी माणसे मात्र समाजाच्या पर्यायाने देशाच्या प्रगतीला बाधक ठरतात. स्वराज्याच्या कामासाठी स्वतःच्या मुलाचं लगीन सोडून कोंढाणा जिंकण्यासाठी निघालेले तानाजी मालुसरे यांच्या त्यागपूर्ण कार्याचा आदर्श आज किती नागरिकांना घ्यावासा वाटतो ? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. खरंतर आपण स्वीकारलेलं काम मग ते कोणतेही असो, काहीही असो ते मन लावून निष्ठेने करणे हीच आज खरी देशसेवा आहे आणि हेच खरे देशप्रेम आहे. जीवनात यशस्वी होणारी माणसे इतरांच्या प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यापेक्षा आपल्या कामातून देतात.

आपल्या सभोवताली असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा संपूर्णपणे अभ्यास करून त्यातून आपल्याला आपले काम कसे उत्तम करता येईल ? आपले उद्दिष्ट आपल्याला कशा प्रकारे साधता येईल ? याचाच ते विचार करतात. महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या संकल्पनेचा व त्याच्या पूर्णतेचा सखोल अभ्यास केला होता. कोणत्याही प्रसंगात ते स्वराज्याच्या, स्वातंत्र्याच्या ध्येयापासून दूर गेले नाहीत. आजची मराठी शाळांची अवस्था बिकट वाटावी अशीच आहे. काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत कारण विद्यार्थी संख्या कमी होत आहे. काही ठिकाणी तुकड्या कमी होत आहेत. शिक्षक सरप्लस होत आहेत.

सरप्लस शिक्षक शासनाकडे दुसरी शाळा मिळावी म्हणून समायोजनासाठी प्रयत्न करत आहेत. पण याही प्रतिकूल परिस्थितीत काही शाळा विद्यार्थी संख्या टिकवून ठेवत आहे तर काही ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढत आहे. अशा मराठी शाळांचा सर्वे होण्याची आवश्यकता आहे. तेथे नेमके काय काम होते ते बघणं आवश्यक आहे.

केवळ समाजाच्या मानसिकतेवर आरोप करणे हा उपाय नाही. आज सर्वत्र इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले असतानाही काही मराठी शाळा या परिस्थितीतही उत्तम उपक्रम व कार्यक्रम करीत आहेत. आहे त्या परिस्थितीत आपल्या कामातून व कृतीतून आजूबाजूच्या समाजाला याची जाणीव करून देत आहेत की मराठी शाळा याच खऱ्या अर्थाने उत्तम पर्याय आहेत किंबहुना आज अशा काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे. अशा शाळा प्रत्यक्षात काय करतात याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. 'असर' चा अहवाल स्पष्टपणे सांगतो की सध्या शाळेत मुलं म्हणावी तशी शिकत नाहीत. तेव्हा आपले काम पूर्ण झाले असे शिक्षकांनी म्हणणे चुकीचे आहे. स्वतःच्या कामाबद्दल जर आपण असमाधानी असलो तर आपण अधिक प्रगतीसाठी मेहनत घेऊ. त्यासाठी नवीन मार्ग शोधू.

आपल्या राष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभे केले. अनेक वर्षापासून ची गुलामगिरी आणि विविध प्रकारचे यातनायुक्त जीवन त्यांनी संपुष्टात आणले. स्वाभिमान संपलेल्या समाजात स्वराष्ट्राचे स्फुल्लिंग जागवले. आपापसातील वाद, तंटे, भांडणे मिटवली. विविध जातीपातींमध्ये विभागलेल्या समाजाला एका छताखाली आणले. कसे केले असेल त्यांनी हे काम ? याचे उत्तर शोधा. म्हणजे आपल्याला आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. अशी प्रतिकूलता ज्या ज्या ठिकाणी दिसते, त्या सर्वांनी महाराजांचा आदर्श ठेवावा.

उदा. बिघडलेले सामाजिक वातावरण, आर्थिक स्थैर्याचा अभाव, सुरक्षा व्यवस्थेतील दोष इत्यादी. इथे उदाहरण मराठी शाळांचे दिलेले आहे. कारण त्या दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आहेत. सर्व समस्यांचे निराकरण सरकारने करावे ही अपेक्षा न ठेवता एक जबाबदार नागरिक म्हणून एकट्याने किंवा समूहाने काय करता येईल ? याचाही विचार करायला हवा. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. अशावेळी तरुण वर्गाने महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत जसे महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले तसा आपण एखादा उद्योग-व्यवसाय उभारून नोकरी मागण्यापेक्षा, नोकरी देणारे का होऊ नये ? याचा विचार करणे आज काळाची गरज आहे. नकारात्मक प्रतिकूल परिस्थिती असली तरी मनाची तशी असता कामा नये. कारण मनातली नकारात्मकता माणसाला काहीच करू देत नाही. मग प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नही होत नाही.

यश-अपयश या खूपच दूरच्या गोष्टी आहेत. पण मनाची सकारात्मकता माणसाला प्रतिकूल परिस्थितीतही पुढे जाण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी, उद्दिष्टाप्रत पोहोचण्यासाठी मदत करते. ही सकारात्मकता असेल तर माणसाची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक होते. उदाहरणार्थ राजाराम महाराजांचा जन्म झाला तेव्हा ते पालथे जन्माला आले. समाज या गोष्टीकडे अशुभ घटना म्हणून पहात होता. जेव्हा ही गोष्ट महाराजांना सांगण्यात आली तेव्हा ते म्हणाले की तो दिल्लीची पातशाही पालथी घालण्यासाठीच जन्माला आला आहे. ही विचारांमध्ये असलेली सकारात्मकता माणसाला खूप प्रेरणा, ऊर्जा देऊन जाते.

एकदा काही करून दाखवण्याची जिद्द निर्माण झाली की पुढचं काम सोपं होतं. व्यक्ती त्या ध्येयावर काम करायला सुरुवात करतो त्यासाठी मार्ग काढतो. मला या संदर्भात राष्ट्रमाता जिजाऊंचा उल्लेख करावासा वाटतो. या मातेजवळ असणाऱ्या निरीक्षण शक्तीच्या जोरावर त्यांनी भूतकाळापासून बोध घेत आपला वर्तमान आणि भविष्य बदलून दाखवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दाखविली. खरंतर हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज या तिघांना एकमेकांशी जोडणारा, स्वराज्य निर्मितीची आकांक्षा जागवणारा एक समान धागा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब.

आपल्या मुलाला म्हणजे बाळराजे शिवबांना चांगले मित्र मिळावेत म्हणून या मातेने अनेकाविध प्रयत्न केले. आपल्या मुलांचे मित्र चांगल्या वळणाचे विचारांचे असतील तर आपले मूल आपोआप चांगल्या वळणावर जाईल. ते जर वाईट वळणाचे असतील तर मुल वाईट मार्गाला जायला वेळ लागणार नाही. तानाजी, बाजी, येसाजी असे जिवलग बालमित्र महाराजांना मिळालेत. आजच्या आईने मूल घडवताना सतत जिजामातेचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. असंच एक दुसरे उदाहरण द्यावेसे वाटते. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात असलेला मुंगळा हा जेव्हा आपल्याला चावतो.

त्याचा चावा इतका कडकडून असतो की तो काही केल्यास सोडत नाही. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात पण तो चावा सोडत नाही. शेवटी रक्त येते तेव्हाच त्याला काढता येते. मला वाटते जीवनामध्ये आपण स्वीकारलेल्या कार्यसंदर्भात इतकेच चिवट असले पाहिजे. म्हणजे अपयश येणारच नाही. मर्यादित साधन सामग्री असताना सुद्धा अधिकाधिक यश कसे मिळवावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याकडे असणाऱ्या सर्व क्षमतांचा येथोचित अभ्यास व सभोवतालच्या अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीचा अभ्यास करून, निरीक्षण करून आपले उद्दिष्ट साध्य करणे हेच महाराजांनी आपल्याला शिकवले आहे.

त्याचा आपण जीवनाच्या सर्वच क्षेत्रात तंतोतंत वापर केलाच पाहिजे. सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यश कसे मिळवावे याचा आदर्श महाराजांनी स्वतः आपल्यासमोर घालून दिला. सर्व समाज जात, धर्म, पंथ या विविध प्रकारच्या सामाजिक विषमतेत अडकलेला असताना या सर्व विषमतेवर मात करून सर्वांमध्ये हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली. समस्या या प्रत्येकासमोर असतातच या भूतलावरचा प्रत्येक प्राणी सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करत असतो. जसे विद्यार्थ्यांसमोर अवघड विषयाची, नोकरी करणाऱ्या समोर प्रमोशनची किंवा आर्थिक पॅकेज ची, उद्योजकासमोर व्यवसाय चालेल किंवा नाही पैसा येईल किंवा नाही याची, तरुण मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळवण्याची किंवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची, वृद्ध माणसांना आजारपणाची, आई-वडिलांना मुलांच्या करिअरची, नोकरी असलेल्यांना नोकरी जाण्याचे टेन्शन असते. अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करताना नियमितपणे आपण छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत त्या समस्येवर मात केली पाहिजे. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आधीच्या घटनेशी संबंध असतो जसे दुसऱ्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला पहिल्या महायुद्धा नंतर झालेल्या तहांचा अभ्यास करावा लागतो, तर पहिल्या महायुद्धाच्या कारणांचा अभ्यास करताना आपल्याला जर्मनीचा चान्सलर बिस्मार्कच्या कुटनितीचा अभ्यास करावा लागतो.

अगदी तसेच घडून गेलेल्या व घडत असलेल्या घटनांचे मूळ शोधताना आपल्याला त्यांच्या इतिहासात जावेच लागते. समस्या अनंत आहेत. त्या आजच किंवा कधी सुटतील हे सांगता येत नाही. कदाचित त्या कधीही न सुटणाऱ्याही असतील. आपल्याला त्या समस्यांच्या छातीवर पाय देऊन उभे राहता आले पाहिजे. त्या समस्यांवर विजय मिळवता आला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने असाही विचार करणे अत्यंत आवश्यक आहे की देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशासाठी काय करत आहे ? कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी ध्येयापासून विचलित न होता मानसिक धैर्य खचू न देता पुढे जात राहणे, काम करत राहणे हेच महाराजांनी आपल्याला सांगितले आहे.

आपल्याला आपल्या वर्तमान काळात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची उत्तरे इतिहासात दिसतात. इतिहासाचा डोळस अभ्यास केल्यास त्या प्रश्नाचे उत्तर त्वरेने मिळते. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने सुद्धा दैवाला म्हणजे नशिबाला शेवटचे स्थान दिले आहे ते म्हणतात *'कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन’

कर्म हेच सर्वश्रेष्ठ आहे. तू कर्म करीत रहा. फळ तुला मिळणारच आहे. महाभारतात कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू असताना कर्णपर्वात ज्याप्रकारे ऐन युद्धाच्या समरांगणात राजा शल्ल्याने कर्णाची अवहेलना केली. त्याचा उद्देश कर्णाची मानसिकता बिघडवणे एवढाच होता. त्याच युद्धात द्विधा मनस्थितीत असणाऱ्या अर्जुनाला मात्र भगवान श्रीकृष्णांनी कर्माचा उपदेश केला.

आजचे समाजातील चित्र बघितलं तर स्पष्टपणे दिसते की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या कर्म सिद्धांताची आवश्यकता असताना सर्वत्र मात्र शल्ल्या प्रमाणे अवहेलना करणाऱ्यांची गर्दी दिसते.
प्रयत्नांनी यश मिळेलच पण यश मिळेपर्यंत प्रयत्न केलेच पाहिजे कोणीतरी सांगून गेले ‘हिम्मत ए मर्दा तो मदद ए खुदा’.


आपण भारतीय खरं तर शिवरायांचे मावळेच. आजच्या परिस्थितीत एक मावळा म्हणून माझं काम काय ? आता लढाया करायच्या नाहीत पण प्राप्त परिस्थितीत या देशाला आत्मनिर्भर करण्याच्या मार्गात एक मावळा म्हणून स्वतःला झोकून द्यायचे आहे. निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत राहणे त्यासाठी जिवाच रान करणे. हे ही जमत नसेल किमान नेमून दिलेल्या किंवा ठरवलेल्या निर्धारित कामापेक्षा थोडं जास्त काम केलं तर परिस्थिती निश्चितच बदलू शकते. उदा. भाजीविक्रेत्याकडे भाजी घेताना त्याने निर्धारित मापापेक्षा थोडी भाजी जास्त दिली तर आपल्याला बरं वाटतं अगदी हाच विचार आपण आपल्या कामासंदर्भात केला तर. पण दृश्य स्वरूपात असे होताना दिसत नाही हेच खरे दुर्दैव आहे.


महाराजांना आपल्या सवंगड्यांमध्ये एक उच्च कोटीची प्रेरणा निर्माण करता आली .त्यामुळेच ते स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्यास तयार झाले. जे धान्याचे दाणे जमिनीत स्वतःला काढून घेतात ते पुढे हजारो दाने निर्माण करतात. पण जे गाडून घेत नाहीत त्यांचे पीठ होते. आपल्याला नवीन काही निर्माण करावयाचे असेल तर असेच स्वतःला गाडून घेण्याची मानसिकता असली पाहिजे. आपल्या घरात दीडशे किंवा दोनशे वर्षांपूर्वी असलेल्या व्यक्तीचे नाव आपल्याला माहीत नसते कारण त्यांचे पीठ झालेले असते. पण माझ्या मते आज देशासाठी स्वतःला गाडून घेणाऱ्या नरवीरांची गरज आहे. तेच देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जातील.


विद्यमान पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राचीन संस्कृतींचे पुनर्जीवन व समस्त भारतीय भाषांना चांगले दिवस येणार आहेत. वय वर्ष तीन पासून ची मुले शाळेत येतील म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीचा वैभवशाली व गौरवपूर्ण इतिहास आपण मुलांना बाळघुटीप्रमाणे लहान असल्यापासून देऊ. यातून भविष्यातील राष्ट्राभिमानी पिढी निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल.


देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबानी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा देश उद्या आत्मनिर्भर होऊन जगात विश्वगुरु होईल यात शंकाच नाही. कर्तव्यदक्ष माणसांमधूनच कामाला शिस्त येईल. प्रत्येकाने देशासाठी एकच केले पाहिजे, जे महात्मा गांधीजी म्हणत ‘देशाच्या विकासासाठी जो बदल व्हावा असे तुम्हांला मनापासून वाटते, सर्वप्रथम तो बदल स्वतःमध्ये करा.

मी माझे कर्तव्य नीट करणार आहे. असे वर्तन करणारी जी थोडी माणसे या देशात आहेत, तीच देशाचे भवितव्य घडवतील यावर माझा ठाम विश्वास आहे. एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी ‘महानतेचा मानदंड छत्रपती शिवराय’ हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझे हे वैचारिक मंथन मानवी जीवनाच्या आनंददायक प्रगतीसाठी आवश्यक पण आज प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या विकासासाठी संजीवनी ठरावे हीच सदिच्छा.


तुम्हीं माझे विचार काळजीपूर्वक वाचले याबद्दल मी आपला ऋणी आहे. माझ्या लिखाणातली न्यूनाधिक्य पुरते-सरते करून घ्यावे व कमी अधिक तीव्र रचनेबद्दल माफ करावे. “फोडिले भांडार धन्याचा तो माल | मी तो केवळ हमाल भारवाही||” ही तुकोबारायांची उक्ती, तुम्हासारख्या जाणत्यांकडून खरे तर सगळे काही घेऊनच मी हे माझे म्हणून लिहितो. याबद्दलही माझ्या लिखाणाचा उदार मनाने स्विकार करावा.

धन्यवाद.
लेखक प्रा.प्रशांत शिरुडे
के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली.
prashantshirude1674@gmail.com
9967817876

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!