घनसावंगी तालुक्यात बनावट डीएपी खताची विक्री ? घनसावंगी पोलिस ठाण्यात ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जालना : बनावट डीएपी खताची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकासह तिघांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने १६ जानेवारी रोजी सायंकाळी नाथनगर (शिवनगाव रस्तावर), येथे ही कारवाई केली. यावेळी ७५ हजार ६०० रुपये किमतीच्या ५६ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत.
योगेश्वरी कृषी सेवा केंद्राचे राहुल शिवाजी आरडे (रा. नाथनगर, ता. घनसावंगी), माउली कृषी सेवा केंद्राचे गोपीनाथ आप्पाराव वाघ (रा. टाकरवन, ता. माजलगाव), रमेश पिंपळे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
नाथनगर येथील योगेश्वरी कृषी सेवा केंद्रात चंबल फर्टिलायझर्स अण्ड केमिकल्स लिमिटेड या कंपनीचे बनावट डीएपी खत विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाचे खतनिरीक्षक महादेव काटे यांना मिळाली होती. त्यानुसार काटे व त्यांचे सहकारी १६ डिसेंबर रोजी नाथनगर येथे पोहोचले. दुकान उघडण्यासाठी नकार मिळाल्याने घनसावंगी पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या सुमारास योगेश्वरी कृषी सेवा केंद्राच्या मागे असलेल्या गुदाम उघडून तपासणी सुरू केली. चंबल फर्टिलायझर्स केमिकल लिमिटेड गाढेपणा कोटा राजस्थानचे डीएपी खत आढळून आले. त्यावेळी तेथे आलेल्या आरडे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर तो माल टाकरवन (ता. माजलगाव) येथील कृषी सेवा केंद्रातून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे व्यवहार रमेश पिंपळे यांच्या मोबाइल क्रमांकावर झाल्याचे दिसून आले.
दोन नमुने घेतले
या कारवाईवेळी कृषी विभागाच्या पथकाने दोन प्रकारच्या गोण्यांतून तपासणीसाठी नमुने घेतले आहेत. दोन्ही नमुने तीन प्रतीत घेऊन पंचांसमक्ष पंचनामा केला. त्यातील एक प्रत राहुल आरडे यांच्याकडे देण्यात आली असून, एक प्रत तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविली जाणार आहे. तिसरी प्रत विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात राहणार आहे.