दारूबंदीची धडक मागणी: खडका गावातील महिलांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा; “पोलिस पैसे घेऊन माघारी जातात” असा थेट आरोप

घनसावंगी प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील खडका गावातील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आज, १० एप्रिल रोजी थेट तिर्थपुरी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. “पोलिस येतात आणि पैसे घेऊन जातात” असा गंभीर आरोप महिलांनी केला असून, त्यांनी गावातील दारूबंदीची ठाम मागणी करत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
खडका गावातील मारोती मंदिराजवळ एकत्र येऊन महिलांनी “एक पाऊल सातत्याच्या संघर्षाकडे” या घोषवाक्याखाली मोर्चा काढला. तिर्थपुरी पोलिस ठाण्यापर्यंत काढलेल्या या मोर्चामध्ये महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर निषेध नोंदवला.
पोलिसांवर गंभीर आरोप: कारवाईऐवजी लाच स्वीकारली जाते?
महिलांनी आरोप केला की, तिर्थपुरी पोलिस वारंवार गावात येतात पण प्रत्यक्ष कारवाई न करता दारू विक्रेत्यांकडून पैसे घेऊन माघारी जातात. परिणामी हे विक्रेते बिनधास्तपणे म्हणतात, “आम्ही पैसे देतो, आमचं कोणी काही करू शकत नाही.” या परिस्थितीमुळे गावात अवैध दारू व्यवसाय बिनधास्त सुरू असून, त्याचा थेट परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर, घरगुती वातावरणावर आणि आर्थिक स्थितीवर होत आहे.
जालन्याचे पोलिस अधीक्षक दारूबंदी विभागाचे पोलिस अधीक्षक व सपोनी तीर्थपुरी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या तक्रारीत महिलांनी पुढील मुद्दे उपस्थित केले आहेत:
गावात मोठ्या प्रमाणात देशी दारू विक्री सुरू आहे., व्यसनामुळे आरोग्य बिघडत असून, घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे., कुटुंबातील आर्थिक स्थिती खालावली असून, समाजजीवन धोक्यात आले आहे., परवानाधारकाला ग्रामपंचायतीकडून कोणताही ठराव किंवा ना-हरकत प्रमाणपत्र न देता परवाना मिळाल्याची शंका असून, याची चौकशी करण्यात यावी.
या तक्रारीवर सरपंच ज्योती जाधव, उपसरपंच श्रीहरी एडके यांच्यासह अनेक महिलांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, तक्रारीची प्रत तिर्थपुरी पोलिस ठाण्यालाही देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीचा खुलासा
या प्रकरणावर बोलताना सरपंच ज्योती जाधव यांनी स्पष्ट केले की, “खडका ग्रामपंचायतीकडून कोणत्याही दारू विक्रेत्यास ठराव अथवा ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे परवानाधारकाला परवाना मिळालाच कसा, हा प्रश्न गंभीर आहे.”
महिलांची व्यथा: आत्महत्येचा इशारा
गावातील महिला सुनिता गोरे, रुक्मिणी जाधव व सुमन जाधव यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने घराघरात वाद होत आहेत. महिलांना आणि लहान मुलांना यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नाही, तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”
समाज परिवर्तनाची सुरूवात
खडका गावातील महिलांचा हा संघर्ष म्हणजे केवळ दारूबंदीची मागणी नसून, समाजपरिवर्तनाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. आता पोलिस प्रशासन यावर काय भूमिका घेतं आणि या आंदोलनाला काय न्याय दिला जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.