जालना जिल्हा

जालन्यात १२८ अनुकंपा उमेदवारांना शासन नियुक्तीचे आदेश वितरित:पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व्हीसीद्वारे सहभाग

जालना, दि.
मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक- टंकलेखक संवर्गातील एकुण १२८ उमेदवारांना आज शासकीय नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व्हीसीद्वारे यात सहभाग घेऊन शासकीय नोकरी मिळालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेस गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश असलेल्या या कार्यक्रमातंर्गत अनुकंपा नियुक्ती (गट-क व गट-ड) उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक- टंकलेखक संवर्गातील एकुण १२८ उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी एकुण १२८ उमेदवारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार झाले, असा सुर कार्यक्रमातून उमटला. अनुकंपा व लिपीक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आ. अर्जुन खोतकर, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

पालकमंत्र्यांकडून उमेदवारांचे अभिनंदन व जिल्हा प्रशासनाचे कौतुक

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी होत नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांचे मन:पुर्वक अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात सर्वत्र रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत अधिकाधिक नागरिकांना, पशुधनाला सुरक्षित स्थळी हलवले. रेड अलर्टमध्ये जिल्हा प्रशासनाने समन्वय ठेवून खुप छान काम केले. जिल्हा प्रशासनाचा प्रत्येक कामात नेहमी पुढाकार असतो. आपले काम कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत कौतुक केले.

१२८ जणांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार

शासकीय सेवेत कार्यरत असतांना अधिकारी व कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबियांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्‍याचे सुधारित धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पारित केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मागील महिन्यात झालेल्या मेळाव्यात उमदेवारांना शासन निर्णय व नियुक्ती प्रकियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात अनुकंपा तत्वावर गट-‘क’ आणि गट-‘ड’ पदासाठी प्रतिक्षा यादीतील ७९ उमेदवारांची, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही ४९ उमेदवारांची नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. अशी एकुण १२८ उमेदवारांना नियुक्तीपत्रे यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!