वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे मूर्तीतील शेतकऱ्याचा १० एकर ऊस जळून खाक

विडिओ बातमी पाहण्यासाठी
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील मूर्ती गावात विजेच्या मुख्य लाईनच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकरी शिदराम विश्वनाथ वडले यांचा तब्बल १० एकर ऊस अवघ्या काही मिनिटांत जळून खाक झाला. या आगीमध्ये शेतकऱ्यांचे सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.शनिवारी दुपारी अचानक विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे ऊसाच्या शेताला आग लागली.
ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आग इतक्या वेगाने पसरली की काही वेळातच संपूर्ण ऊस आगीत भस्मसात झाला.शेतकरी वडले यांनी आग लागण्यापूर्वीच वीज वितरण कंपनीला वारंवार तक्रारी आणि सूचना दिल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.मोठ्या कष्टाने वाढवलेला ऊस जळून गेल्याने वडले कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे. परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून शेतकरी व ग्रामस्थांनी शेतांतून जाणाऱ्या विजेच्या तारांची त्वरित दुरुस्ती करून सुरक्षिततेची पावले उचलण्याची मागणी केली आहे. ही घटना केवळ एका शेतकऱ्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण शेतकरी वर्गासाठी इशारा ठरावी, अशी भावना व्यक्त केली जात आहे



