मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आमदार यांच्या घरी दिवाळी शेतकरी समाजाच्या घरी शिमगा

प्रतिनिधी / परतूर-मंठा
प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष
सतत पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परतूर-मंठा तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकरी समाज कोसळला आहे. पिकांचे नुकसान, शेतीत साचलेले पाणी, जनावरांसाठी चारा-अन्नाचा तुटवडा या संकटामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर युती सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि मंत्र्यांनी एकत्रित बैठक घेऊन “दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल” अशी घोषणा केली होती. मात्र आज लक्ष्मीपूजनाचा शुभदिवस असूनही शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत पोहोचलेली नाही.
दिवाळीच्या सणाला सत्ताधाऱ्यांच्या घरी आनंदोत्सव सुरू असताना, शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार आणि शिमगा साजरा होत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी केली आहे. शासनाने दिलेली आश्वासने केवळ शब्दांपुरती राहिली असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात रिकामे आश्वासनच आले आहे. सोळंके म्हणाले, “शासन लक्ष्मीची पूजा करत आहे, पण शेतकरी मात्र आपल्या दु:खाची पूजा करत आहे. ही दिवाळी नव्हे, तर शासनाच्या असंवेदनशीलतेची साक्ष आहे.”
मनसेने शासनाकडे मागणी केली आहे की, शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून शेतकरी समाजाने किती दिवस आंदोलन करायचे काम करायची का आंदोलन हा प्रश्न उपस्थित होतो.



