लेकीच्या स्वप्नांना शिक्षणाची वाट; आरगडे गव्हाणात साकारतेय‘कॉम्रेड आकांक्षा सोनावणे सार्वजनिक वाचनालय’

विठ्ठल कांगणे यांच्या हस्ते भूमिपूजन; स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन, मोफत दीड लाखांच्या पुस्तकांची घोषणा
जालना , प्रतिनिधी :
अवघ्या १९व्या वर्षी निधन झालेल्या आकांक्षा सोनावणे हिची अभ्यासातील जिद्द, कणखर वक्तृत्व आणि शिक्षणाची तळमळ कायम स्मरणात राहावी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आरगडे गव्हाण येथे ‘कॉम्रेड आकांक्षा सोनावणे सार्वजनिक वाचनालय’ उभारण्यात येत आहे. या वाचनालयाचे भूमिपूजन स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
मुंबई येथे स्थायिक असलेली आकांक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. अभ्यासातील तिची मेहनत आणि ध्येयवेड उल्लेखनीय होते. सराव परीक्षेत पहिल्याच वर्षी तिने १०० पैकी ९७ गुण मिळविले होते. मात्र, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने तिचे दुःखद निधन झाले. तिच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
मात्र, या दुःखातून सावरत आकांक्षाचे आई-वडील मीरा व कल्याण सोनावणे यांनी आपल्या लेकीची शिक्षणाची जिद्द आणि ध्येयवेड पुढे नेण्याचा निर्णय घेतला. तिच्या स्मरणार्थ जन्मभूमी आरगडे गव्हाण येथे सार्वजनिक वाचनालय उभारण्याचा संकल्प त्यांनी केला. गावातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना शिक्षणाची संधी आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
सोनावणे कुटुंबीयांनी गावातील दोन गरजू व होतकरू मुलींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांच्या MPSC व UPSC परीक्षेपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा संकल्पही व्यक्त केला आहे. आकांक्षाला हीच खरी आणि अर्थपूर्ण श्रद्धांजली ठरेल, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
भूमिपूजनानंतर प्रा. विठ्ठल कांगणे यांनी स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन केले. तसेच वाचनालयासाठी सुमारे दीड लाख रुपये किमतीची पुस्तके देण्याची घोषणा केली. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठी मदत मिळणार आहे.

कार्यक्रमास कामगार नेते कॉम्रेड दादाराव पटेकर, कॉम्रेड मजिद शेख, विलास कांबळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बन्सी शेळके, उद्योजक भाऊसाहेब भालेराव, सरपंच बबलू भैय्या गुजर, उपसरपंच समाधान तोडके, अशोकराव राजे जाधव, दीपक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘एका लेकीच्या स्वप्नातून अनेक मुलींच्या भविष्याला दिशा’
आकांक्षाच्या स्मृतीला शिक्षणाच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा सोनावणे कुटुंबीयांचा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
एवढे मोठे दुःख मनात असतानाही समाजोपयोगी उपक्रम हाती घेतल्याबद्दल सोनावणे दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे वाचनालय ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे केंद्र ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



