घनसावंगी तालुका

शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा दुष्काळ; घनसावंगी कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..!

उपसंपादक : किशोर मोरे जालना

-तालुक्यात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे शेतीचे अर्थकारण कोलमडले असताना शेतकऱ्यांना आधार देण्याची जबाबदारी असलेला कृषी विभाग मात्र नेमका करतोय काय, असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

पाण्याअभावी ऊसासह विविध पिके धोक्यात आली आहेत. काही ठिकाणी पिके पूर्णतः वाळली, तर हाती आलेल्या उत्पादनातही ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याऐवजी कृषी विभागाचे कामकाज केवळ कागदोपत्रीच सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीसाठी हजारो रुपये खर्च केले.

मात्र पाण्याअभावी मेहनत आणि भांडवल दोन्ही मातीमोल ठरण्याची वेळ आली आहे. पुढील हंगामात कोणते पीक घ्यावे, उपलब्ध पाण्याचे नियोजन कसे करावे, कमी पाण्यात येणारी पिके कोणती, दर्जेदार बियाणे कुठे मिळतील, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. मात्र कृषी विभागाकडून अपेक्षित पातळीवर मार्गदर्शन होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कार्यालयात अधिकारी नाहीत, बांधावर मार्गदर्शन नाही!

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी कार्यालयात गेले असता अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करणे, नुकसानग्रस्त पिकांची माहिती संकलित करणे, पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे आणि शासनाच्या योजनांची माहिती देणे ही कृषी विभागाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी प्रत्यक्षात कितपत पार पाडली जात आहे, याचे उत्तर विभागाने देण्याची गरज आहे.

कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर कृषी कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी दुसऱ्या तालुक्यांतून अपडाऊन करीत असल्याचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. शेतकऱ्यांना गरज असताना कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसतील, तर त्यांच्या अडचणी सोडविणार कोण? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कामकाजाची तपासणी होते की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

  कृषी विभाग नेमका कोणासाठी? शेतकरी संकटात असताना कृषी विभागानेच त्यांच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र शेतकऱ्यांनाच कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असतील, तर या यंत्रणेचा उपयोग काय? मोबाईल ॲपवर माहिती उपलब्ध असल्याचे सांगणे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे यात मोठा फरक आहे. शेतकऱ्यांना केवळ योजनांची माहिती नको, तर प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि योजनांचा लाभही हवा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करावी, दुष्काळसदृश परिस्थितीत पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन करावे, अनुदानित बियाण्यांची सविस्तर माहिती द्यावी आणि अपडाऊन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वरिष्ठांनी तपासणी करावी, अशी मागणी शाम मुकणे, दादाराव चव्हाण, रुस्तुम पवार, ओम कापसे, रमेश भोसले, राम तौर, महेश शिंदे, प्रकाश भानुसे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही कृषी कार्यालयाचा कर्मचारी गावात फिरकला नाही. कृषी विभागासह महसूल विभाग, तलाठी, कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्यक्ष बांधावर येऊन पाहणी व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे

कल्याण तौर, प्रगतिशील शेतकरी, उक्कडगाव :

.

संभाजी मुकणे, शेतकरी, मुरमा :

कृषी अधिकारी उंटावरून शेळ्या हाकत असल्याचा अनुभव येतो. मका बियाण्यांच्या उत्पादनाचे मोठे दावे केले जातात; मात्र प्रत्यक्ष प्रयोग, दर्जेदार बियाणे आणि अनुदानाची माहिती मिळत नाही. कृषी विभागाने वस्तुनिष्ठ माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा.

अधिकाऱ्यांचे उत्तर : ॲपवरून मार्गदर्शन मिळत असल्याचा दावा!

तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांनी सांगितले की, ‘विस्तार ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते. आमचे कर्मचारीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.’ मात्र कर्मचारी अपडाऊन करीत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी बोलणे टाळले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या गंभीर तक्रारींचे निराकरण नेमके कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

  या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक गहनीनाथ कापसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!