घनसावंगी तालुकाजिल्हा गुन्हेगारी बातमी

दरोड्यानंतर ग्रामस्थ सरसावले; अरगडे गव्हाणमध्ये दररोज रात्री ग्रामस्थांची गस्त!

दरोड्याच्या घटनेने गावात भीतीचे वातावरण; हातात काठ्या घेऊन ग्रामस्थांचा पहारा, चोरट्यांचा छडा लावण्याची पोलिसांकडे मागणी

प्रतिनिधी | कुंभार पिंपळगाव

घनसावंगी तालुक्यातील अरगडे गव्हाण येथे माजी सरपंच सचिन गुजर यांच्या घरी झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेनंतर संपूर्ण गाव सतर्क झाले आहे. गावात पुन्हा अशा घटना घडू नयेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत दररोज रात्री गावात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. हातात काठ्या घेऊन तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही गावाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरले असून, गावातील गल्लीबोळांत रात्रभर पहारा दिला जात आहे.

गावातील सुमारे १५ ते २० ग्रामस्थ दररोज रात्री गस्त घालत आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून गस्तीचे नियोजन केले जात असून, गावातील प्रत्येक गल्ली आणि परिसरात लक्ष ठेवले जात आहे. या गस्तीमध्ये सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच आजी-माजी प्रमुख पदाधिकारी सहभागी होत आहेत. गावाच्या सुरक्षिततेसाठी सर्वजण एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे.

नऊ दरोडेखोरांनी फोडले होते सीसीटीव्ही कॅमेरे

१५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास नऊ जणांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून माजी सरपंच सचिन गुजर यांच्या घरात प्रवेश केला होता. चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी सुमारे सात लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली होती. या घटनेला पंधराहून अधिक दिवस उलटूनही दरोडेखोरांचा शोध लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण कायम आहे.

गावाच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थांची एकजूट

दरोड्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता स्वतःच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे. रात्रीच्या वेळी गावातील प्रमुख रस्ते, गल्लीबोळ आणि संशयास्पद हालचाली होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी ग्रामस्थांकडून नियमित गस्त घातली जात आहे. एखादी संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ एकमेकांना माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपचाही उपयोग केला जात आहे.

मात्र, गावातील नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी रात्री जागून पहारा देण्याची वेळ येणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. पोलिस प्रशासनाने दरोड्याच्या घटनेचा गांभीर्याने तपास करून आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, लंपास केलेला ऐवज हस्तगत करावा आणि गावात नियमित पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दरोडेखोरांचा शोध लागेपर्यंत ग्रामस्थांचा हा रात्रीचा पहारा सुरूच राहणार असून, गावाच्या सुरक्षेसाठी अरगडे गव्हाणकरांनी दाखवलेली एकजूट परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!