अंबड तालुका

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य द्या; हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – आमदार हिकमत दादा उढाण

किशोर मोरे /अंबड –

अंबड तहसील कार्यालय येथे आमदार हिकमत दादा उढाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय दुष्काळ आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत अंबड तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी उपस्थित नागरिक, शेतकरी बांधव आणि विविध घटकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे द्यावीत आणि प्रलंबित समस्या प्राधान्याने मार्गी लावाव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार हिकमत दादा उढाण यांनी दिल्या.

दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट कितीही मोठे असले, तरी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी समन्वयाने एकत्रित प्रयत्न केल्यास या नैसर्गिक संकटावर निश्चितपणे मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशासकीय कामकाजात दिरंगाई अथवा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडत अंबड तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, अशा सक्त सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. वीज, पाणी, बोअरवेल अधिग्रहण, महसूलविषयक कामे किंवा इतर कोणतीही समस्या असो, ती तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अधिकाऱ्यांना आवश्यक असलेले सहकार्य, साधने आणि पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तयार आहोत. मात्र, अधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी उपलब्ध राहून तत्परतेने काम करावे, असे आवाहन आमदार हिकमत दादा उढाण यांनी केले.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्री.उमांकात पारधी,तहसिलदार श्री.संताेश माेहीते,गटविकास अधिकारी श्रीमती ज्यांची कडदिवे तसेच तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, महसूल, पंचायत समिती, महावितरण व कृषी विभागाचे कर्मचारी, तालुक्यातील ग्रामस्थ, शेतकरी बांधव आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!