महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त-पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न
जालना, दि. 1 (न्यूज जालना) :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करुन ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व मोजक्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याप्रसंगीचे मुद्दे.
· राज्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला.
· लस उपलब्धतेचे मोठे आव्हान राज्यासमोर असुन कोव्हीशिल्ड संस्थेने 13 लाख व कोव्हॅक्सनीकडून 3 लाख 57 हजार लसीचे डोस राज्याला देण्याचे मान्य केले आहे.
· प्रत्येक जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीचे सत्र राबविण्यात येणार.
· मुंबई, पुणे, नासिक, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांना 20 हजार लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत.
· मध्यम स्वरुपाच्या शहरांना 7 हजार 500 डोस तर छोट्या शहरांना 5 हजार डोस पुरविण्यात आले आहेत.
· पुरवठा करण्यात आलेली लस ही सात दिवस पुरेल अशा पद्धतीने आरोग्य विभागाने नियोजन करण्याच्या सुचना.
· मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करुन घेण्याचे प्रयत्न करण्यात येऊन लसीकरण थांबणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
· लस उत्पादन करणाऱ्या सिरम व भारत बायोटेक या कंपन्याकडून जी लस उत्पादन होणार आहे त्याच्या 50 टक्के भारत सरकारला व 50 टक्के लस राज्य सरकार व खासगी व औद्योगिक दवाखान्यांना देण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
· लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने भारत सरकारच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे.
· ब्रेक द चेन अंतर्गत संपुर्ण राज्यात 15 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेलया कडक निर्बंधाचे सर्व नागरिकांनी तंतोतत पालन करुन शासनास व प्रशासनास सहकार्य करावे.
· प्रत्येक व्यक्तीने मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन करावे.
· विनाकारण रस्त्यावर न फिरता आपल्या घरातच राहुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन.