काळा दिवस : जालन्यात मराठा क्रांती मोर्चा तर्फे अर्धनग्न आंदोलन करून निषेध
आंदोलकांना अटक, गुन्हे दाखल
जालना ( प्रतिनिधी) : आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नको असे मत मांडत बुधवारी ( ता. ०५) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. या निर्णयाच्या विरोधात काळा दिवस पाळून मराठा क्रांती मोर्चा तर्फे छञपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या समोर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. पोलीसांनी आंदोलकांना अटक करून त्यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल केले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या मराठा आरक्षणा बाबत आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवले. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांनी दुपारी तप्त उन्हात छञपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसरात एकञ येऊन अर्धनग्न आंदोलन केले. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणा बाजी करत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला . तसेच मराठा समाजाचा विना अट ओबीसीत समावेश करावा. अशी मागणी आंदोलकांनी केली. केंद्र, राज्य शासन आणि न्याय व्यवस्था यांत आलटून-पालटून सोईस्कर पणे चालढकल सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढाईत अनेकांना बलिदान द्यावे लागले. शिवाय लोकशाही मार्गाने लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे काढून जगासमोर आदर्श निर्माण केला.
महाराष्ट्र शासन आणि मागास आयोगाने दिलेल्या अहवालात मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे. असे स्पष्ट नमूद असतांना ही सर्वोच्च न्यायालयाने त्यांची दखल घेतली नाही. हा एक प्रकारे मराठा समाजावर जाणीवपूर्वक केलेला अन्याय असल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली. पोलीसांनी आंदोलन स्थळी धाव घेऊन. आंदोलन करणारे संतोष गाजरे, सतीश देशमुख, अशोक पडूळ, विजय वाढेकर, आकाश ढेंगळे आदींना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.
प्रतिक्रिया
अतिशय दुर्दैवी निर्णय मराठा समाजाला उध्वस्त करणारा असंवेदनशील निर्णय आहे यावर पुर्णविचार व्हावा -डॉ.हिकमत उढाण
न्यायालयाच्या लढ्यात गरीब मराठा भरडला जातोय. कोणत्या मराठ्या पुढाऱ्यांनी यात प्रयत्न केले याची शाहानिशा होने आवश्यक आहे. निष्क्रिय मराठा पुढाऱ्यांना जागा दाखवणे आवश्यक आहे
सर्वच मराठा समाज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्टीने समृद्ध नाही.९९% गरीब मराठा समाजावर अन्याय करणारा निर्णय, गेली अनेक वर्षे हा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय चूक आहे. समाजावर अन्याय करणारा आहे. या वर पुनर्विचार होणे आवश्यक आहे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे कोर्ट म्हनजे देव नाही, त्यांची आज आठवण येते.