जालना:गर्भपात करणाऱ्या ढवळेश्वर परिसरातील राजुरेश्वर क्लिनिकमध्ये आरोग्य विभागाचा छापा
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले आणि चंदंजिरा पोलिसांची संयुक्त कारवाई
जालना
शहरातील ढवळेश्वर परिसरात असलेल्या राजुरेश्वर क्लिनिकमध्ये अवैधरित्या गर्भपात होत असल्याची माहिती पुणे येथील कुटूंब कल्याण विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांना दिली होती.
त्यानुसार राजुरेश्वर क्लिनिक येथे सापळा लावण्यात आला होता. परंतु ऐन वेळी डॉक्टरने प्रतिसाद न दिल्याने हा सापळा यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने थेट क्लिनिक मध्ये जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. चंदंजिरा पोलिसांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा मारला असता एका महिलेचा गर्भपात होत असल्याचं समोर आलं. त्यानंतर सदरील महिलेला चमन येथील स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि राजुरेश्वर क्लिनिक सील करण्यात आले. सदरील महिलेच्या पोटात स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याची माहिती पथकाने दिली.
सदरील क्लिनिक मधून गर्भपात करण्याच्या गोळ्या, रोख रक्कम आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. तेथील बनावट डॉ. एस बी गवारे हा मात्र सकाळपासूनच बाहेर असल्याने तो पथकाच्या हाती लागला नाही. मात्र तिथे काम करणार्या कंपाउंडरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
रात्री साडेबारा वाजता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या फिर्यादीनुसार चंदंजिरा पोलीस ठाण्यात सदरील डॉक्टर सतीश बाळासाहेब गवारे, संदीप गोरे, डॉ. पूजा गोविंद गवारे, डॉ. प्रीती मोरे आणि मेडिकल मालक स्वाती गणेश पाटेकर आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अन्य व्यक्ती विरोधात भादवि कलम 312, 313, 315, 120 ब, आणि पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदंजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाचण हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह क्लिनिकवर छापा मारून एकास ताब्यात घेतले आहे.
बनावट डॉक्टर एस बी गवारे याने अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय वाकोडे, डॉ.सरोज घोलप, सोनाली कांबळे, मनोज जाधव यांच्यासह चंदंजिरा पोलिसांनी ही कारवाई केली