जालना जिल्हा
जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनी आता ऑनलाईन नाव नोंदणी करावी:जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ
- जालना,दि.:-
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. जालना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून याठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज वाटप व स्वीकृती करता येईल. या सोबतच पदवीधर मतदारांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरी जास्तीत जास्त मतदारांनी ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार मतदार संघासाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम दिनांक 30 सप्टेंबर 2025 ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत केले जाणार आहे यासाठी तहसील कार्यालयात अर्ज स्वीकृती व वाटप करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे नमुना अर्ज क्र. 18 कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्राप्त केल्यापासून दिना.1 नोव्हेंबर 2025 रोजी 3 वर्षे पूर्ण होणारा पदवीधारक असणे आवश्यक आहे त्यांनी पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची ‘मार्कशीट’ झेरॉक्स प्रत,पासपोर्ट साईज फोटो,मतदान ओळखपत्र/आधार कार्ड यापैकी एकाची झेरॉक्स प्रत, नाव बदल असल्यास गॅझेट /विवाह नोंदणी प्रमाणपत्र / प्रतिज्ञापत्र व भरलेला फॉर्म नं. 18 वरील सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात सादर करता येईल.
सोबतच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाईन पद्धतीने मतदार नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यात https://mahaelection.gov.in या लिंकवर जाऊन आपली वैयक्तिक माहिती भरावयाची आहे.सदरील लिंकवर मोबाईल ओपीटी द्वारे नोंदणी करुन आवश्यक ती माहिती व कागदपत्रे भरुन ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नावनोंदणी करता येईल.
तरी जालना जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
_



