जालना जिल्हा

जिल्हा रुग्णालयात अधिकच्या ऑक्सिजन बेडची तातडीने निर्मिती करा- पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन व त्रीसुत्रीच्या पालनाबाबत जनमानसांमध्ये जनजागृती करा


जालना, दि. 28 (न्यूज ब्युरो):- जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललेली संख्या चिंताजनक असुन रुग्णांचा शोध, तपासणी व तातडीने उपचार याबाबींवर भर देत जालना शहरामध्ये स्वॅब संकलनासाठीचे अधिक प्रमाणात केंद्र सुरु करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. संजय जगताप, डॉ. प्रताप घोडके, डॉ. कडले, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अन्न व औषध प्रशासनविभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

images (60)
images (60)


पालकमंत्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यात ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्यात यावी. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी आरटीपीसीआर लॅब असुन या लॅबची दरदिवसाची क्षमता एक हजार स्वॅब तपासणीची असुन दरदिवशी एक हजार टेस्ट झाल्याच पाहिजेच. जिल्हा सामान्य रुग्णालयाव्यतिरिक्त जालना शहरामध्ये अधिक प्रमाणात स्वॅब संकलन केंद्र उघडण्यात यावीत. एक हजार स्वॅबपेक्षा अधिक स्वॅब गोळा करण्यात आल्यास अहवालास उशिर होऊ नये यादृष्टीने स्वॅब औरंगाबाद अथवा पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचुकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. सहवासितांचा शोध घेण्याकामी शिक्षक, अंगणवाडी सेविका, संग्राम आदींची मदत घेण्यात यावी. कोरोना बाधितांच्या सहवासितांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.


ज्या व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आहेत अशा व्यक्तींची अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामार्फत माहिती घेण्यात येऊन त्यांची तातडीने तपासणी करण्यात यावी. ज्या व्यक्तींना सौम्य व मध्यम लक्षणे आहेत व ज्यांच्याकडे घरी पुरेशा प्रमाणात होम क्वारंटाईनसाठी जागा आहे अशाच व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईनची मुभा देण्यात यावी व ज्यांच्याकडे होम क्वारंटाईनसाठी जागा नाही व ज्यांना गंभीर लक्षणे आहेत अशा सर्वांचे सक्तीने संस्थात्मक अलगीकरण करण्यात यावे. ग्रामीण भागामध्येही गट आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्येक चार ते पाच गावे दत्तक घेऊन गावांमध्ये नियमितपणे जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले.

जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले असुन आणखीन आवश्यकता असल्यास सर्व बाबी उपलब्ध करुन देण्यात येतील. टेलिमेडीसीन, ई-आयसीयु यासारख्या अत्याधुनिक सेवांचा उपयोग रुग्णांचा उपचारासाठी करण्यात यावा.
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या बेडव्यतिरिक्त अधिकचे ऑक्सिजन बेडची तातडीने निर्मिती करण्यात यावी. यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करुन घेण्याबरोबरच बेडचे व्य्वस्थित व निटनेटके नियोजन करण्याबरोबरच बेड तसेच आरोग्य सेवांची माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळण्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करण्यात यावी. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिकचे पैसे तर घेण्यात येत नाही ना याबाबत खात्री करण्यात येऊन रुग्णांकडुन उपचारापोटी देण्यात येणारी देयकांची लेखा परिक्षकांमार्फत नियमितपणे तपासणी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील रुग्णांना जालना येथे उपचारासाठी येण्याची गरज पडु नये यासाठी तालुकास्तरावरच व्हेंटीलेटर, ऑक्सिजनबेडसह इतर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या त्या तालुक्यातील रुग्णांनी उपचारासाठी जालना येथे न येता त्यांच्याच तालुक्यात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोयी-सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


कोरोनापासुन बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे सांगत जिल्ह्यात 57 ठिकाणी लसीकरण केंद्रे असुन या लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात यावी. जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रामधुनही लसीकरण करण्याच्या सुचना करत या केंद्रांच्या माध्यमातुन अधिक प्रमाणात लसीकरण करण्याच्या सुचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केल्या.कोरोनाला आपल्यापासुन दुर ठेवण्यासाठी मास्क, सॅनिटायजरचा वापर तसेच सामाजिक अंतराचे पालन ही त्रीसुत्री अत्यंत प्रभावी असुन याबाबत जनमानसांमध्ये होर्डिंग, पॉम्प्लेट तसेच स्थानिक केबलच्या माध्यमातुन व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या
बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!