लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट व जम्बो सिलेंडरची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडून तपासणी
कुठलीही दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घ्या.
जिल्हा कोविड रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट व जम्बो सिलेंडरची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडून संयुक्तरित्या तपासणी
जालना दि. 23 – जिल्हा कोविड रुग्णालय परिसरात असलेल्या लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट व जम्बो सिलेंडरची जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे व जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी आज दि. 22 एप्रिल रोजी संयुक्तरित्या भेट देऊन पाहणी करत या ठिकाणी कुठलीही दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आरोग्य प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोडके, पोलीस निरीक्षक श्री महाजन आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, ऑक्सिजन टॅंकमधून गळती होऊन नुकताच नासिक येथे अपघात झाला असून जालना येथे अशा प्रकारची कुठलीही घटना घडू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना करत लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टची सातत्याने देखभाल करण्यात यावी. लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टचे तज्ज्ञांमार्फत परीक्षण करून घेण्यात यावे. उपलब्ध ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात वापर करण्याबरोबरच ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास अधिक प्रमाणात लागणारी ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन साठवण क्षमता वाढविण्यावर भर देण्यात यावा. या परिसरात सातत्याने स्वच्छता राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.