जालना जिल्हा

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

जालना दि.29 (न्यूज जालना) -राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले.

images (60)
images (60)

राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production) तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आज ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले. या प्रसंगी उदयोग मंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, उदयोग राज्यमंत्री श्रीमती अदिती तटकरे, नियोजन विभाग व उदयोग विभागाचे अप्पर मुख्य सचिव, केंद्रिय सांख्यिकी संचालनालय व उदयोग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्यिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्टया अग्रेसर राज्य असुन देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. सदर निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्येशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगतास, या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणा-या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते. केद्रिय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय, व उदयोग विभागाच्या अधिपत्याखालील उदयोग संचालनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्हयांमधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडुन दरमहा विहित कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उदयोग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करुन राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार असल्याचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!