जालन्यातील सप्तशृंगी स्टील कंपनीत स्फोट; कामगार जखमी
जालन्यातील सप्तशृंगी स्टील कंपनीत स्फोट
न्यूज जालना
जालना शहरातील सप्तशृंगी स्टील कंपनीत स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतीचा स्लॅब कोसळून इमारतीला तडे गेले आहेत.स्फोट झाल्यानंतर कंपनीतील काही कामगार देखील गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.स्फोटाचे कारण अस्पष्ट असून कंपनीत स्फोट कोणत्या कारणामुळे झाला याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना चांगलेच तडे गेले असून पक्क्या इमारतीचा स्लॅब कोसळून पडला.
त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. हा स्फोट झाल्यानंतर अनेकांनी कंपनीकडे धाव घेतली मात्र कंपनी प्रशासनाने कंपनीचे गेट बंद करून कंपनीत मदतीसाठी जाण्यास मज्जाव करत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी या घटनेचं वार्तांकन करू नये म्हणून कंपनीच्या बाहेरील लाईट्स बंद करून अंधार पसरवण्यात आला.यावेळी सदरील कंपनीच्या बाजूला पार्किंग झोन आहे. त्याठिकाणी प्रचंड हादरे बसले त्याचप्रमाणे त्या बिल्डिंगमध्ये भिंतींना तडे गेले.तसेच छताचे प्लास्टर हाद-याने खाली पडलेले दिसून आले. पाच ते सहा प्रचंड मोठ्या आवाजामध्ये स्फोट झाल्याचे कामगारांनी सांगितले.