जालना:शासकीय कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठांना सन्मानाची वागणुक देत कामे प्राधान्याने पुर्ण करा- जिल्हाधिकारी
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विनाशुल्क हेल्पलाईन सुरु कर- जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
(न्यूज जालना):-
ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान लक्षात घेता त्यांचा वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविण्याबरोबरच त्यांचे शारिरीक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीरांचे आयोजन करण्यात यावे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणुक देत त्यांची कामे प्राधान्याने पुर्ण करण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या अनुषंगाने कुठलीही बाब दुर्लक्षित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले. ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 च्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसेय्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमित घवले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, संजय इंगळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर आदींसह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती
ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणुक द्या शासकीय कार्यालयांमध्ये आपले काम घेऊन अनेक ज्येष्ठ नागरिक येत असतात. अशावेळी कार्यालयात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणुक देण्यात यावी. शासकीय कार्यालयात त्यांचे असलेले काम हे तातडीने पुर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याबरोबरच प्रत्येक विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ठराविक दिवसाची निवड करुन याची व्यापक स्वरुपात प्रसिद्धी करत त्यादिवशी ज्येष्ठ नागरिकांची कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात यावीत. ज्येष्ठ नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही, याची काळजीही प्रत्येक विभाग प्रमुखांनी घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांची यादी संकलित करण्यात येऊन जिल्ह्यात 60 वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचे आरोग्य अबाधित राहुन त्यांना असलेल्या आजारावर योग्य उपचार मिळावेत यासाठी ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसुन येणाऱ्या मोतिबिंदु या आजारासह ईतर आजाराबाबत आरोग्य तपासणी व उपचार शिबीरांचे आयोजन करण्यात यावे. नगरपालिकांच्या अखत्यारित असलेल्या दवाखान्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उपचाराची वेगळी व्यवस्था करण्यात यावी. शासकीय रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी डायलिसीसची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना शासकीय रुग्णालयातच सर्व सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींचा प्रस्ताव प्रशासनास सादर करण्यात यावा. जालना जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी ज्येष्ठ नागरिकांना उपचारामध्ये 50 टक्के सवलत देण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत पत्र देण्याच्या सुचना करत राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये अनेक आजारांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याने याचा लाभही ज्येष्ठ नागरिकांना होईल, यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या
विनाशुल्क हेल्पलाईन सुरु करा समाजामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांचे पाल्य पर जिल्ह्यात अथवा परदेशामध्ये राहतात. तसेच जे ज्येष्ठ नागरिक एकाकी राहतात अशा ज्येष्ठ नागरिकांची यादी प्रत्येक ठाणेनिहाय ठेवण्यात येऊन पोलीस ज्येष्ठ नागारिकांवर मैत्रीपुर्ण लक्ष ठेवण्याबरोबरच अशा नागरिकांची महिन्यातुन किमान एकदा भेट घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांना होणारे विविध सतावणुकीसंबंधी तक्रारी प्राधान्याने व खास लक्ष देऊन कायद्याच्या चौकटीत सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. आणीबाणीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा व आवश्यक सुरक्ष विषयक मदत मिळावी यासाइी विनाशुल्क हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.