जालना:वाईदेशी मराठा समाजाची स्वतंत्र नोंद घेवून इतर मागासवर्गामध्ये समावेश करा
जालना (न्यूज) ः मराठवाडा विभागातील वाईदेशी मराठा समाजाची स्वतंत्र नोंद घेवून या समाजाचा समावेश इतर मागासवर्गामध्ये समावेश करण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगास
आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र कुणबी युवा संघाच्या पदाधिकार्यांनी राज्याचे मदत, पुनर्वसन व ओबीसी?विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. राम कुर्हाडे, उपाध्यक्ष संतोष बिडे, राम सावंत, शेख महेमूद, संतोष दिंडे, वसंत कदम यांच्या शिष्टमंडळाने काल दि. 4 ऑगस्ट बुधवार रोजी वडेट्टीवार यांची मुंबई येथे त्यांच्या दालनात भेट घेवून निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यातील ओबीसी, एन.टी., व्हीजेएनटी समाजाची जात निहाय गणना करण्याबाबतचा ठराव घेवून तशी शिफारस राज्य शासनास केली आहे. मराठवाड्यामध्ये वाईंदेशी मराठा हा जात समूह कुणबी या जात समूहाचे घटक आहे. परंतु स्वतंत्र अशी नोंद नसल्यामुळे त्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने इतर मागास प्रवर्गाच्या सवलती मिळत नाहीत. वाईंदेशी मराठा समाज संघटनेने यापूर्वी न्या. खत्री आयोग, सराफ आयोग, राणे समिती, न्या. गायकवाड आयोग यांच्याकडे वेळोवेळी निवदने देवून यासंबंधी इतर मागासवर्गामध्ये समावेश करण्याबाबत विनंती केली आहे. तसेच सन 2009 मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यातील वाईंदेशी मराठा समाजाचे सर्वेक्षण संबंधीत जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामार्फत केलेले आहे. त्यावेळी समाज कल्याण विभागाने सदर समाजाचा इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याबाबत शिफारस केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सन 1977 च्या औरंगाबाद जिल्हयाच्या शासकीय गॅझेटमध्ये कुणबी समाजाची उपजात म्हणून या वाईदेशी समाजाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. या प्रकरणी राज्य मागासवर्ग आयोगास योग्य ते निर्देश देवून या समाजाची स्वतंत्र नोंद घेवून इतर मागासवर्गामध्ये समावेश करण्याबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे