मजुरांना कामाचा मोबदला वेळेत मिळेल याची सर्व अधिकाऱ्यांची दक्षता घ्या- अपर मुख्य सचिव नंदकर
जालना दि. 5 –जिल्ह्यात विकास कामे होण्याबरोबरच मागेल त्याला त्याच्याच गावात काम मिळण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन अधिकाधिक कामे करण्याबरोबरच मजुरांना त्यांचा कामाचा मोबदला वेळेत मिळेल याची सर्व जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देश रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, राज्य प्रशिक्षण समन्वये निलेश घुगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, कार्यक्रम व्यवस्थापक एस.आर. देवडे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी व रोहयोअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
नंदकुमार म्हणाले, राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत विविध प्रकारची 262 कामे करता येणे शक्य असुन यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो. त्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये रोहयोअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे प्रमाण कमी आहे. या योजनेंतर्गत केवळ ठराविक कामेच न करता अधिकची कामे करता येऊ शकणाऱ्या 262 कामांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समित्यांना प्राप्त होणाऱ्या कामांचे प्रस्ताव तातडीने मंजुर होतील, याची सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या मजुरांना मोबदला अदा करतेवेळी चुकीचे बँक खाते, आयएफएससी क्रमांक चुकीचा नोंदविणे अशांमुळे मोबदला वेळेत अदा होत नाही. त्यामुळे या बाबींची काटेकोरपणे तपासणी करुन काम केलेल्या प्रत्येक मजुराला त्याच्या कामाचा मोबदला वेळेत मिळेल यादृष्टीने यंत्रणांनी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचना करत कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय खपवुन घेतली जाणार नाही. जे अधिकारी, कर्मचारी काम करणार नाहीत अशांवर कारवाई करण्याचा ईशाराही नंदकर यांनी यावेळी दिला.
कडवंची येथील पाणलोट कार्यक्रमाची अपर मुख्य सचिवांनी केली पहाणी
जालना तालुक्यातील कडवंची या गावास अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी प्रत्यक्ष भेट देत नाबार्ड पुरस्कृत इन्डो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणलोटाची माहिती जाणुन घेतली. कडवंची या गावातील शेतकऱ्यांशीही प्रत्यक्ष संवाद साधत गावाने पाणलोटाचे कशाप्रकारे नियोजन केले, गावात द्राक्ष पिकांची कशा प्रकारे लागवड केली जाते, उत्पन्न किती घेतले जाते यासह वनीकरण, वनशेती, फळबाग, बांध बंदिस्ती, चेकवेअर, चेकडॅम, शेततळे आदी बाबींची माहिती त्यांनी यावेळी जाणुन घेतली. तदनंतर वरुडी या गावास भेट देऊन नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेंतर्गत हवामानावर आधारित कापुस पीक तसेच शेती शाळेविषयीची माहिती उपस्थित शेतकऱ्यांकडून जाणुन घेत प्रत्येक शेतकऱ्यांने कल्पक पद्धतीने शेती करुन आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, विजयअण्णा बोराडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, कृषि विज्ञान केंद्राचे एस.व्ही. सोनुने, कृषि अभियंता पंडित वासरे, किटक शास्त्रज्ञ अजय मिटकरी आदींची उपस्थिती होती.