मतदार संघात विविध विकास कामाबरोबरच रस्ते विकासाला प्राधान्य-पालकमंत्री राजेश टोपे
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
रस्ते या विकासाच्या नाड्या आहेत. दळणवळण प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान होण्यासाठी पक्के व मजबूत रस्ते असणे आवश्यक आहे. विकास प्रक्रियेत रस्त्यांचे महत्त्व अधोरेखित होत असल्याने मतदारसंघात इतर विकास कामाबरोबरच रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
कुंभार पिंपळगाव कॅनॉल फाटा-मुर्ती- गुंज बु. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री श्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर भागवत रक्ताटे, कल्याणराव सपाटे,रघुनाथ तौर, रवींद्र तौर, प्रकाश तांगडे, अजीमभाई पठाण, लक्ष्मणराव कंडूळे, रवींद्र आर्दड, सुशील तौर, राजा देशमुख, सुरेश सोळुंके, सोमनाथ वागदरे, नायब तहसिलदार गौरव खैरनार, गट विकास अधिकारी एम.जी.जाधव आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यासमोर आर्थिक अडचण असली तरी मतदारसंघात विकास कामांसाठी अडचण येऊ न देता अनेकविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. संपुर्ण मतदारसंघात मजबुत व पक्क्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगत आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून रस्ते विकासासाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे.रांजणी ते राजाटाकळी या 43 किलोमीटरच्या रस्त्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन तीन पदरी सिमेंट रस्त्याचे काम या ठिकाणी करण्यात येणार असून या रस्त्याचा फायदा अनेक गावांना होऊन दळणवळणाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. येणाऱ्या काळात गोदा काठावरील भागात पक्क्या रस्त्यांची उभारणी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगत या भागात होणारी रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
विद्युत विकासालाही अधिक प्रमाणात चालना देण्यात येत असून जिल्ह्यातील जनतेला योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी 132 व 33 केव्हीची विद्युत उपकेंद्रे उभारण्यात येत आहेत. वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना अखंडितपणे वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी एसडीटी ट्रान्सफार्मरही संपुर्ण जिल्ह्यात बसविण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागामध्ये तलाठ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य व्यक्तींची अनेक कामे असतात. जिल्ह्यात तलाठी कार्यालयांची दुरावस्था असल्याने अनेकवेळा तलाठ्यांना शोधण्यातच नागरिकांचा वेळ6 जातो. सर्वसामान्य व्यक्तींची असलेली विविध कामे त्वरेने मार्गी लागावीत, त्यांना त्यांच्या कामासाठी चकरा माराव्या लागु नयेत यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तलाठी सज्ज्यांसाठी स्वतंत्र ईमारतींच्या उभारणीसाठी निधी मंजुर करण्यात आला असून जिल्ह्यात अधिक चांगल्या पद्धतीने पोलिसिंग होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तीर्थपुरी, कुंभारपिंपळगाव या ठिकाणी नव्याने पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगत सिंचनाची सुविधा अधिक प्रमाणात वाढावी यासठी जालना तालुक्यातील हातवण प्रकल्पासाठी 297 कोटी 39 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन घेण्यात आला असुन या प्रकल्पासाठी भु-संपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे 714 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याबरोबरच 24 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील मुला-मुलींना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक गावात इयत्तानिहाय शाळाखोली असणे आवश्यक आहे. याच बाबीचा विचार करून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून शाळा खोल्यांसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला असून प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचे घर मिळावे यासाठी गतवर्षात 4 हजार घरकुले मंजुर करुन घेतली असुन चालु वर्षात 10 हजार घरकुलांची मागणी जिल्ह्यासाठी करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक विकासाची कामे करण्याबरोबरच समाजातील निराधार, निराश्रित, अपंग यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावातील तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगत महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी निर्माण केलेल्या बचतगटांना बँकांकडून कर्ज मिळून देऊन अधिक चांगल्या पद्धतीने उद्योग व्यवसाय करण्यासाठीही तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांच्या हस्ते मानेपुरी ते राणीउंचेगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, कु. पिंपळगाव ते लिंबोणी रस्ता कामाचा शुभारंभ, नाथनगर ते राजुरकर कोठा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ, नायनगर ते भादली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरनाचाही शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, महिलांची उपस्थिती होती.