राजुरकर कोठा येथील जिल्हा परिषद शाळा बनली जनावरांचा गोठा
मुख्याध्यापक,शालेय व्यवस्थापन समिती डोळे असून आंधळे;वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कोरोना आजारामुळे अनेक शाळा बंद आहे.परंतु शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांना शाळेत हजर राहण्याचे बंधनकारक निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे.घनसावंगी तालुक्यातील राजुरकर कोठा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मुख्याध्यापक, शिक्षक ऐवजी जनावरांचा मुक्त संचार असल्याचे दिसत आहे.त्यामुळे शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे.याकडे शाळेचे मुख्याध्यापक,शालेय व्यवस्थापन समिती डोळे असून अंधच्या भूमिकेत दिसत आहेत.
विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन मिळून उज्ज्वल भविष्य घडावे यासाठी जिल्हा परिषद शाळेची स्थापना करण्यात आलेली आहे.मात्र याला राजुरकर कोठा येथील जिल्हा परिषद शाळा अपवाद ठरत आहे.काही नागरीक हे शाळेच्या दरवाजासमोर शेळी बांधत असल्याने शाळेला गोठ्याचे स्वरूप आले आहे.जिथे विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू यायला हवा तिथे गुरांचा आवाज ऐकायला येतोय, असे चित्र सध्या दिसून येत आहे. एकंदरीत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शाळेकडे फिरकत नसल्याने जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आला असून त्यामुळे घाणीचे वातावरण तयार होत आहे.याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.