पाणी बचतीच्याबाबत आयुक्त डॉ. कलशेट्टी यांचा जालन्यात ग्रामस्थांशी संवाद
पाणी बचतीच्या लढ्यात गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे राज्य आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. अटल भूजल योजनेअंतर्गत यावल पिंप्री येथे बुधवारी (दि.२५) आयोजित ग्रामसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.
जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब उगले, यावल पिंप्रीचे सरपंच रामनाथ पवार, भूजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक श्री. मेश्राम,अभियंता श्री.सुरडकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, सहायक भूवैज्ञानिक एस.डी. चव्हाण, घनसावंगीचे उपविभागीय अधिकारी श्री. कापडणीस, तहसीलदार देशमुख, तालुका कृषी अधिकारी श्री. रोडगे गटविकास अधिकारी श्री. जाधव, उपअभियंता श्री. खरात यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आयुक्त डॉ. कल्लशेट्टी म्हणाले, की जिल्ह्यातील जवळपास ४७ गावांची अटल भूजल योजनेत निवड झालेली आहे. निवड झालेल्या गावांनी योजनेत करावयाच्या कामांसाठी गाव आराखडे तयार करणे, ताळेबंद तयार करणे, पाणी बचतीच्या विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करावी. तसेच शेतीसाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचतीला प्राधान्य द्यावे. येणाऱ्या काळात अटल भूजल योजनेअंतर्गतही गावात विविध कामे केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अटल भूजल योजनेत निवड झालेल्या गावांमधील सरपंचांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. कोवीड संसर्गाचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला.