102 क्रमांकाच्या 23 रुग्णवाहिकांचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

जालना, दि. 4 – ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळाव्यात यासाठी जालना जिल्ह्यास प्राप्त झालेल्या 23 रुग्णवाहिकांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी उपाध्यक्ष सतीष टोपे, कल्याण सपाटे,रघुनाथ तौर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ.विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना यापूर्वी 20 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन या 23 अशा एकुण 43 रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. 102 क्रमांकाची रुग्णवाहिका म्हणून यांचा उपयोग करण्यात येणार असल्याचे सांगत गरोदर मातांना प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात या रुग्णवाहिकांची मोफत सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.