जालना शहरातील वाहतुक अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणे तातडीने काढा- जिल्हाधिकारी यांचे आदेश
जालना : जालना शहरामध्ये बेकायदेशीर असलेली अतिक्रमणे, वाहतुक सिग्नल सुविधा नसणे, रस्त्यावर मोकाट जनावरांचा संचार, पार्किंग सुविधा नसणे या बाबींमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी रस्त्यावरील बेकायदेशिर अतिक्रमणे तातडीने काढुन घेत आवश्यक ठिकाणी वाहतुक सिग्नल सुविधा सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
जालना शहरातील वाहतुकीच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राठोड बोलत होते.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओमकार चांडक, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक एम.ए. सय्यद, जिल्हा वाहतुक शाखेचे एस.बी. सानप, नगररचना विभागाचे एस.एस. भालेराव, पी.एस. पवार आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, जालना शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी बेकायदेशीर असलेली अतिक्रमणे नगरपालिकेने पोलीस विभागाच्या सहकार्याने तातडीने हटवावीत. तसेच शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर बसणाऱ्या मोकाट जनावंरामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने नगर परिषदेने कोंडवाड्याची तातडीने दुरुस्ती करुन घेत हा प्रश्न येत्या १५ दिवसांमध्ये मार्गी लावण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.
जालना शहरामध्ये मामाचौक, सुभाष चौक व शनिमंदिर परिसरामध्ये वाहतुक सिग्नल बसवण्यात आलेले आहेत. परंतु हे वाहतुक सिग्नल बंद अवस्थेमध्ये आहेत. शहरात वाहतुक सुरळीत होण्याच्यादृष्टीने बंद अवस्थेमध्ये असलेले वाहतुक सिग्नल तातडीने सुरु करण्यात यावेत. त्याचप्रमाणे अंबड चौफुली व मंठा चौफुली या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणावर नव्याने सिग्नल बसविण्याची कार्यवाही करावी. सिग्नल बसविण्यात आलेल्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, रोडच्या मध्ये रस्ता दुभाजकाचे पांढरे पट्टे यासह आवश्यक ती बाबींसह हे सिग्नल अविरत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
शहरामध्ये वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नसल्यानेही वाहनांची कोंडी होत असुन यासाठी पी१ पी२ पार्किंग व्यवस्था सुरु करण्यात यावी. शहरामध्ये नो पार्किंग, नो एन्ट्री आदी साईन बोर्ड तातडीने उभारण्यात येऊन पी१ पी२ पार्किंगची कडक अंमलबजावणी होईल, यादृष्टीने नियोजन करण्याबरोबरच शहरामध्ये नो हॉकर्स झोन घोषित करुन सार्वजनिक रस्त्यावरील फळ व ईतरसाहित्य विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करुन देण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
जालना शहराच्या मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अत्यंत आवश्यकता असुन ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना करत यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे सांगत शहरामध्ये अनाधिकृतपणे लावण्यात येणाऱे बॅनर, पोस्टर्स तातडीने काढुन टाकण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.