घानेवाडीचा ग्रामसेवक निलंबीत करा-भीम आर्मीचे आमरण उपोषण सुरू
जालना/प्रतिनिधी
घानेवाडी (ता.जालना) येथील मयत सय्यद उस्मान सय्यद मोईदिन यांच्या नावावरील मिळकत वारसाआधारे पत्नीच्या नावे करण्याकरीता संचिका ग्रामसेवक श्रीनाथ घुगे यांच्याकडे दिली. मात्र त्यांनी चालढकलपणा करून, याकडे दुर्लक्ष केले. सदरील घराचे नामांतर वारसाआधारे करावे व ग्रामसेवक श्रीनाथ घुगे यांची चौकशी करून, त्यांना तात्काळ निलंबीत करावे, या मागणीसाठी भीम आर्मीच्या वतीने जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर 27 डिसेंबरपासून उपोषणास सुरूवात करण्यात आली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांनी दिला.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, शाहजहान सय्यद उस्मान व नुरजहॉ सय्यद उस्मान दोन्ही रा. घाणेवाडी येथील आहे. घाणेवाडी येथे असलेले घर सय्यद उस्मान सय्यद मोईदिन यांच्या नावे असून, त्यांचे दि. 3 मे 2020 रोजी निधन झाले. त्यामुळे अर्जदार शाह जनि सय्यद उस्मान व नुरजहा सय्यद उस्मान यांनी वारसाआधारे सदरील घर नामांतर करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला. परंतू ग्रामसेवक घुगे यांनी याकडे मुद्दाम दुर्लक्ष करून, चालढकलपणा केला.
सदरील वारसाआधारे नामांतराची कार्यवाही करावी व दुर्लक्ष करणार्या ग्रामसेवकाविरूध्द कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणास सुरूवात केली आहे. उपोषणामध्ये सुभाष दांडेकर यांच्यासह शाह जहान सय्यद उस्मान, नुरजहा सय्यद उस्मान यांचा समावेश आहे.