जालना: उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घेतला विविध कामांचा आढावा
कोव्हीडग्रस्तांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
जालना, दि. 11 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी ऑक्टोबर महिन्यात पुणे, नाशिक, धुळे, पालघर व जालना जिल्ह्याच्या दौऱ्याप्रसंगी देण्यात आलेल्या सुचनांवर केलेल्या अंमलबजावणीसंदर्भातचा आढावा दूरदृष्यप्रणालीद्वारे आज दि. 11 जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमिंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असुन प्रत्येक जिल्ह्यातील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घेणाऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांना व्हिडीओ सुविधेद्वारे बोलण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक त्यासुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. महिलांच्या असलेल्या समस्यांचे निराकारण होण्यासाठी पोलीस विभागाने महिला दक्षता समित्यांच्या बैठकांचे आयोजन करावे. कोव्हीडमुळे या बैठका प्रत्यक्षरित्या घेता येत नसतील तर त्या दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात याव्यात. तसेच महिलांसाठी असलेले कायदे व आरोग्य विषयक माहितीसाठी प्रत्येक तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात यावे. कोव्हीड19 चा संसर्ग वाढू नये यादृष्टीने मास्क, सॅनिटायजर, सुरक्षित अंतराचे पालन करण्याबरोबरच लसीकरणाबाबत जनमानसांमध्ये विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करुन सर्वदूर जनजागृती करण्याचे निर्देश दिले. जालना जिल्ह्यात किशोरवयीन मुलींच्या समुपदेशनाचे काम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे अभिनंदन करत घरेलू कामगारांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या मदतीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची माहिती पाठविण्याची सुचना करत निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जालना दौऱ्यादरम्यान दिलेल्या सुचनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, कोव्हीडमुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने पालक गमावलेले बालके तसेच विधवा महिलांच्या सर्व्हेक्षणाचे काम जिल्ह्यात पुर्ण करण्यात येऊन त्यामध्ये 841 महिला विधवा तर 427 बालके आढळली. एक पालक गमावलेल्या 427 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत असुन त्यापैकी 320 बालकांना 1 हजार 100 रुपयांप्रमाणे निधी वितरित करण्यात आला असुन 107 बालकांना येत्या दिवसांमध्ये निधी वितरित करण्यात येत आहे. दोन्ही पालक गमावलेल्या 11 बालकांपैकी 10 बालकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी 5 लक्ष रुपयांची मुदतठेव ठेवण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनामार्फत 10 लक्ष रुपयांची रक्कम मिळण्यासाठी पोस्ट खात्यामध्ये बालकांचे खाते काढण्यात आले असुन एका बालकाला मदत देण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिला व बालकांना मदत देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हाटास्क फोर्स समितीची एक पुनर्वसन उपसमिती स्थापन करण्यात आली असुन महिला व बालकांच्या पुनर्वसनाचे या समितीमार्फत करण्यात येत आहे. तसे कोव्हीडमध्ये पालक गमावलेल्या 59 किशोरवयीन मुली असुन या मुलींचे समुपदेश महिला व बालविकास विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी माझे गाव, बालविवाहमुक्त गाव संकल्पना राबविण्यात येत असुन बालविवाह रोखण्यासाठी ग्रामीण भागात व तालुकास्तरावर प्रशिक्षणही देण्यात येत असल्याचे सांगत नोंदणीकृत रिक्षा चालकांना मदत, घरेलू कामगारांना मदत, शेतकरी महिलांना बि-बियाणे वाटप आदी माहितीही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी दिली.