जालना जिल्ह्यात मिळाला इतका पीकविमा !
जालना जिल्ह्यातील 1 लाख 88 हजार 829
शेतकऱ्यांच्या खात्यात 108.86 कोटी रुपये पिक विम्याची रक्कम जमा-जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड
जालना दि. 18 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 मध्ये जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकूण 1 लाख 73 हजार 906 शेतकऱ्यांना 103.26 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आलेली होती.त्यापैकी एकूण 1 लाख 70 हजार 532 शेतकऱ्यांना 103.02 कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात आलेली आहे.तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 18 हजार 297 शेतकऱ्यांना 5.84 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली असून स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शिल्लक 3 हजार 374 शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई काम अदा करण्याचे काम चालू असून ते लवकरच पूर्ण होईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिली.
दिनांक 29 जून 2020 च्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप व रब्बी हंगामासाठी सन 2020-2021 पासून तीन वर्षासाठी रिलायंस जनरल इन्शुरंस विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.त्यानुषंगाने सन 2021-2022 च्या खरीप हंगामामध्ये एकूण 5 लाख 5 हजार 508 शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग नोंदविला आहे.त्यामध्ये सोयाबीन पिकासाठी 1 लाख 44 हजार 54,कापूस पिकासाठी 34 हजार 805,बाजरी पिकासाठी 54 हजार 999,तूर पिकासाठी 67 हजार 642,मका पिकासाठी 28 हजार 595,मुग पिकासाठी 1 लाख 17 हजार 637,उडीद पिकासाठी 57 हजार 776 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.29 जून 2020 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 10.4 नुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकूण 1 लाख 90 हजार 134 शेतकऱ्यांनी नुकसान पूर्वसूचना विमा कंपनीस सादर केल्या होत्या.त्यामध्ये एकूण 1 लाख 73 हजार 906 शेतकऱ्यांना विमा कंपनीने पात्र घोषित केले असून 16 हजार 228 शेतकऱ्यांना अपात्र घोषित केलेले आहे.तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाई निश्चित करताना पिकाची वाढीची अवस्था व नुकसानीची टक्केवारी विचारात घेऊन केलेली आहे.
योजनेच्या मार्गदर्शक सुचणेनुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत सोयाबीन पिकासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण 7 महसूल मंडळामध्ये 18 हजार 297 शेतकऱ्यांना 5.84 कोटी विमा नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली आहे.तसेच काढणी पश्चात नुकसान अंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 423 नुकसान पूर्वसूचना प्राप्त झालेल्या होत्या.त्यामध्ये विमा कंपनीने 807 शेतकऱ्यांना 38.46 लक्ष विमा नुकसान भरपाई मंजूर केलेली असून बाकी 3 हजार 616 शेतकऱ्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले असून नुकसान भरपाई निश्चिती करण्याचे काम चालू असल्याचे विमा कंपनीने कळविले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आतमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती वा काढणी पश्चात नुकसान अंतर्गत नुकसान पूर्वसूचना दिलेली नव्हती त्यांना शासन निर्णयानुसार हंगामाच्या शेवटी पिक कापणी प्रयोगावर आधारित संबधित महसूल मंडळाच्या वा तालुक्याच्या येणाऱ्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे विमा नुकसान भरपाई निश्चिती करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोठेही तक्रार अर्ज दाखल करून नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना यांनी सांगितले