जालना: गुंगीचे औषध देऊन जवानाला लुटले
जालना प्रतिनिधी
पिरपिंपळगाव येथे गुंगीचे औषध देऊन एका जवानास लुटल्याची घटना भरदिवसा घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.चार जणांनी पेढ्यात गुंगीचे औषध देऊन एका सैनिकाला लुटल्याची घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथे घडली. नारायण शिवाजी पवार (२६ रा. दगडवाडी, ता. बदनापूर) असे सैनिकाचे नाव असून, त्यांच्यावर जालना येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
दगडवाडी येथील सैनिक नारायण शिवाजी पवार हे दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झालेले आहेत. त्यांचे लग्न ठरल्याने काही दिवसांपूर्वीच ते गावाकडे आले होते. शुक्रवारी सकाळी लग्नासाठी डिजे बुक करण्यासाठी नारायण पवार हे पिरपिंपळगाव येथे चारचाकीने जात होते.
पिरपिंपळगावाच्या जिल्हा परिषद शाळेजवळील पुलाजवळ आल्यावर स्विफ्ट गाडीवरून आलेल्या चौघांनी नावाने हाक मारून त्यांना थांबविले. तू सैन्यात भरती झाला. आम्हाला पेढे खाऊ घातले नाही. माझा भाऊही पोलीसमध्ये भरती झाला. हा पेढा घे. पेढा खातच नारायण पवार हे बेशूध्द झाले. चोरट्यांनी त्यांना गाडीमध्ये बसून घाणेवाडी तलावाजवळ नेले. चोरट्यांनी हातातील ३० रूपयांची सोन्याची अंगठी व खिशातील ६ हजार काढून फरार झाले. काही वेळाने नारायण पवार यांच्या मित्राने त्यांना फोन केला. तेव्हा पवार यांनी झालेली घटना मित्राला सांगितले. मित्राने धाव घेऊन त्यांना तात्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.