सागर सह.साखर कारखान्यात ऊसतोड मजुराचा खून
ऊसाची बैलगाडी खाली करण्यावरून दोन मजुरामध्ये वाद
तीर्थपुरी वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील ऊसतोड कामगार गुलाब केरभान सोनवणे हे दि.२६ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ऊसतोडणी करून बैलगाडीत भरून तिर्थपुरीच्या सागर साखर कारखान्यात घेऊन आले होते. बैलगाडीतील ऊस कारखान्यातील गव्हाणीजवळ क्रेनखाली उतरवीत असताना दीपक लक्ष्मण गायकवाड (रा. खालापुरी) याने आपली ऊसाची गाडी आडवी लावली होती.ही आडवी लावलेली बैलगाडी काढण्यास सांगितल्यावरून ऊसतोड मजूर गुलाब सोनवणे आणि दीपक गायकवाड यांच्यात वाद झाला.या वादानंतर दीपक गायकवाड याने थेट गुलाब सोनवणे यांच्या बैलगाडीत उडी मारून, गुलाब यांच्या गुप्तांगावर लाथा मारल्या.त्यामध्ये मारहाणीत गंभीर जखमी होऊन गुलाब सोनवणे हे जागीच मरण पावले.याप्रकरणी गोंदी पोलिसांनी मयत गुलाब सोनवणे यांचा मुलगा नवनाथ सोनवणे यांचा फिर्यादीवरून आरोपी दीपक गायकवाड याच्याविरुद्ध भादंवि. ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे पुढील तपास करीत आहेत.