कुंभार पिंपळगाव जिल्हा परीषद ,पंचायत समिती निवडणूकीचे वाजले बिगुलला !
जांबसमर्थ / प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद,व पंचायत समितीची मुदत आगामी मार्च महिन्यात संपणार आहे. ही निवडणूक अगदी दोनच महिन्यावर येऊन ठेपल्याने आतापासूनच राष्ट्रीय पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस,भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार फिल्डींग लावलेली आहे.भावी जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य होणाऱ्या इच्छुकांनी लग्नसमारंभ, चहापाणी,बैठका, अंत्यविधी, अशा कामावर अधिक जोर देत आहेत. सध्या बाजारपेठेतील हॉटेल,गावातील पारावर ‘चहा पे चर्चा’करीत आगामी होऊ घातलेली निवडणूकीची चर्चा दिवसभर रंगत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सोशल मिडियावर ही प्रचाराचा धुराळा पेटलेला असून अनेकांचे भावी जिल्हा परीषद सदस्य या आशयाचे बॅनर प्रसारित होत आहे.निवडणूक आयोगाकडून अद्याप आरक्षण आणि आराखडा जाहीर झालेला नाही.
तरीसुद्धा कुंभार पिंपळगाव जिल्हा परिषद गटात अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून गावफेऱ्या सुरू केल्याचे चित्र आहे.गेल्या
पंचवार्षिक निवडणूकीत कुंभार पिंपळगाव जिल्हा परीषद गटातून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते अंशिराम कंटुले हे पक्षाकडून बंडखोरी करीत अपक्ष विजयी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश करून पुन्हा शिवधनुष्य हाती उचले आहेत.ते आगामी निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडून पुन्हा सज्ज झाले आहे.त्याचबरोबर राष्ट्रवादी, भाजपाकडून या गटात निवडणूक लढविण्यासाठी संख्या मोठी आहे. सोशल मिडियावर या इच्छुकांनी भावी सदस्य म्हणून गाजावाजा सुरू केला आहे.
पंधरा दिवसापूर्वी या गटातील गावांची फेररचना झालेला बनावट आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. आराखड्या विषयी प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. त्यामुळे या गटातील गावे बदलणार की तेच राहणार याबाबत उत्सुकता लागली आहे. जिल्हा परीषदेच्या निवडणूकी संदर्भात प्रशासकीय स्तरावर गाव रचना किंवा गट आरक्षण निश्चित करण्यात आले नाही. असे असताना इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूकीत आम्हीच फिक्स उमेवार असल्याचा दावा सोशल मिडियावर होत असून उमेवारांची रंगीत तालीम सुरू आहे. दरम्यान कुंभार पिंपळगाव गटात अनेकजण शिवसेना, भाजपा,राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहे. मात्र निवडणुकीचा बिगुल वाजल्यावरच पक्षाकडून अधिकृत तिकीट कुणाला मिळणार हे निवडणूक जाहीर झाल्यावर चित्र स्पष्ट होणार आहे.