किर्लातून बेसूमार वाळुउपसा सुरु
मुजोरी वाढली : लिलाव नसतांनाही रस्ता तयार ; रात्रीतून शेकडो ब्रास चोरी
तळणी : मंठा तालुक्यातील किर्ला येथून पुर्णा नदीपात्रात थेट ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ता तयार करुन ( ता. २८ ) रात्रीतून शेकडो ब्रास वाळुचे अवैध उत्खनन केल्याचे उघड झाले .
किर्ला येथील स्थानिक ट्रॅक्टर व टेम्पोधारकानी वाहने नदीपात्रात उतरविण्यासाठी जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदून तयार केला . या ठिकाणाहून शुक्रवारी रात्रीच्यावेळी शेकडो ब्रास अवैध वाळु उत्खनन करुन मंठा शहरातील बांधकामांना सर्रास वाळु पुरविण्यात येत आहे.
रात्री काम , दिवसा आराम …
शनिवारी व रविवारी सुट्टीचा दिवशी वाळुमाफियाकडून अवैध वाळु वाहतूकीचा सपाटा सुरु असते. वाळुमाफिया हे गावांतील पदाधिकारी व राज्यकर्त्यांचे निकटवर्तीय असल्याने वाळुमाफियाना ग्रामस्थ विरोध करीत नाहीत . तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचे ‘अर्थपुर्ण’ दुर्लक्ष असते. वाळु माफियाकडून दिवसा आराम व रात्रीच्यावेळी बेसुमार वाळुउपसा सुरु आहे.
कारवाईचा सूचना – जाधव
परतूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांना विचारले असता , किर्ला येथील अवैध वाळुचोरी तात्काळ बंद करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्याचे जाधव म्हणाले.