पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

जालना, दि. 28- उज्वल भविष्यासाठी तरूणांनी मोठी स्वप्न जरूर बघावीत, मात्र कोणत्याही कामाला छोटं समजू नये, कौशल्यपूर्ण प्रशिक्षण प्रामाणिकपणे व गांभीर्याने आत्मसात करून आपण प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या मार्फत आज बेरोजगार तरुणांसाठी जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डाॅ. बी. आर. गायकवाड , प्राचार्य डी. एस. गजहंस, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे आदीसह विविध कंपन्याचे प्रतिनिधी व बेरोजगार तरूण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, आज औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले आहेत. या क्षेत्रातील उद्योगांना ज्या प्रकारचे मनुष्यबळ अपेक्षित आहे, त्या पद्धतीने तरूणांनी कौशल्य आत्मसात करावे. यासाठी शासनाने विविध संस्थांच्या माध्यमातून कोर्सेस उपलब्ध केले आहेत. तरूणांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळण्यासाठी राज्य व केंद्रशासन आणि जिल्हा प्रशासन नेहमीच प्रयत्नरत असते. महत्वाची बाब म्हणजे आपल्या पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनामुळे जालना जिल्ह्यासाठी ‘मॉडेल ट्रेनिंग सेंटर’ शासनाकडून मंजूर झाले आहे. काही दिवसांत या सेंटरची सुरुवात होईल. या सेंटरमुळे तरुणांना नियमितपणे मार्गदर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे.
कौशल्यपूर्ण कोर्सचे प्रशिक्षण घेताना ते गांभीर्याने व प्रामाणिकपणे घ्यावे, असा सल्ला देताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड पुढे म्हणाले की, केवळ प्रमाणपत्रासाठी प्रशिक्षण घेऊ नये. कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे तरूणांना निश्चितपणे करिअरच्या अनेक संधी मिळतील. कठोर मेहनतीने या संधीचे सोनं करावे. मोठं स्वप्न बघत असताना कुठल्याही कामांना लहान समजू नका. आत्मसात केलेल्या कौशल्याप्रमाणे सुरुवातीला कमी पगाराची नोकरी मिळाली तरी निराश होऊ नका. प्रामाणिकपणे मेहनत आणि अनुभवाच्या बळावर भविष्यात निश्चितपणे तुम्हाला चांगला पगार मिळेल. महत्वाचे म्हणजे करिअर करीत असताना सुरक्षित झोनमधून बाहेर यावे. माझ गाव, माझ्या जिल्ह्यातच मला करिअर करायचे असे न ठरवता, जिथे चांगली संधी मिळेल तेथे अवश्य जावे. उत्तम करियरसोबतच जीवनात वाचनाची आवडही जोपासावी. चांगली पुस्तके जरूर वाचावीत. जेणेकरून आपल्या आयुष्याला चांगली दिशा मिळू शकेल.
यावेळी प्राचार्य श्री गजहंस आणि प्रशासकीय अधिकारी श्री. गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन डा. संजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश बहुरे यांनी केले. पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यास 288 उमेदवारंची उपस्थित होती.त्यापैकी 255 उमेदवारांनी मुलाखती दिल्या तर 102 उमेदवारांची निवड कण्यात आली.
उपस्थित नियोक्ते(कंपनी)
* महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड,पुणे – 500 पदे
प्राथमिक निवड-19
* नवभारत फर्टीलायझर औरंगाबाद- 101 पदे
प्राथमिक निवड-25
*एन आर बी बेरिंग कंपनी प्रा. लि.जालना- 7 पदे
प्राथमिक निवड-09
* एल जी बी प्रा.लि. नवीन MIDC जालना- 100 पदे
प्राथमिक निवड-20
*विनोदराय इंजिनियरिंग प्रा. लि. जालना- 8 पदे
प्राथमिक निवड-05
* ठाकुरजी सोलवेक्स प्रा.ली जालना- 7 पदे
प्राथमिक निवड-07
* विक्रम टी प्रोसेसर प्रा.ली.जालना- 10 पदे
प्राथमिक निवड-17 उमेदवाची निवड झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल बोरकर,सुभाष कदम , मदन पाटोळे,प्रदिप डोळे,उमेश कोल्हे आणि दिनेश उढाण परिश्रम केले.