डायल ११२ क्रमांकावर खोटी माहिती देणे पडले महागात; पोलिसांत गुन्हा दाखल
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
आपत्कालीन परीस्थितीत नागरीकांना तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून डायल ११२ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.मात्र राजाटाकळी (ता.घनसावंगी) येथील लक्ष्मण सर्जेराव देवकुळे वय (४५) यास डायल ११२ नंबरवर खोटी माहिती देणे चांगलेच महागात पडले असून,त्यांच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,लक्ष्मण देवकुळे हे शुक्रवार (दि.५) रोजी रात्री दहा वाजेपासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत डायल ११२ या नंबरवर दारूच्या नशेत वारंवार फोन करून मला मारहाण करीत असल्याचे सांगितले.
येथील पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोकॉ.बाळासाहेब मंडलीक व पोकॉ.दहीवाळ हे तत्काळ त्या ठिकाणी गेले असता इसम डायल ११२ वर फोन करून त्याचा मोबाइल बंद करीत होता.दरम्यान,पोलिसांना दारूच्या नशेत मारहाण झाल्याची खोटी माहिती देऊन विनाकारण त्रास देत असल्याचे आढळून आले.सदर इसमाच्या मोबाईल क्रमांकावरून सायबर क्राइमकडून लोकेशन काढून यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.