घनसावंगी येथे अ.भा.कि.सभा लालबावटाचे जनावरांसह शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
घनसावंगी प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी ग्रामपंचायत कडून योग्य निवड केलेल्या लाभार्थ्यांचे 19 बांधावर वृक्ष लागवड आणि 13 जनावरांच्या गोठ्याचे प्रस्ताव पंचायत समिती घनसावंगी येथे मागील दोन महिन्यांपूर्वी दाखल केलेले आहेत.परंतु अद्याप त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कार्यालयातील मग्रारोहयो विभागातील संबंधित कर्मचारी चिरी मिरी साठी मुद्दामहून हे प्रस्ताव निकाली काढत नाहीत. हा गैर कारभार आहे.त्यामुळे संतप्त होऊन किसान सभेच्या वतीने आज (दि.८) सोमवार रोजी पंचायत समिती कार्यालयात जनावरांसह शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुद्दामहून टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विनाविलंब आमच्या समक्ष चौकशी करावी,दोषी असलेल्या संबधीत कर्मचाऱ्यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, प्रलंबित शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्वरित निकाली काढून त्यांना त्या योजनेचा लाभ द्यावा. यासाठी जनावरांसह आदी मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.आंदोलन करण्यात येणार असे रीतसर निवेदन दिनांक 05 ऑगस्ट 2022 रोजी देऊन कळवूनही पंचायत समितीत आज निर्णय देईल असा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता.त्यामुळे आंदोलकांनी संतप्त होऊन प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. घोषणांनी पंचायत समिती परीसर दणाणून सोडला.दरम्यान,गटविकास अधिकारी कदम यांनी येऊन संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा केली.सर्व प्रलंबित प्रकरणे 26 ऑगस्ट पर्यंत निकाली काढले जाईल. असे लेखी आश्वासन दिले.लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी गोविंद आर्द्ड,आसारामजी आर्द्ड,रामेश्वर आर्दड,जनार्धन भोरे,दिगंबर मोरे,दत्ता राऊत,दामोदर व्यवहारे,विठ्ठल आर्द्ड,नामदेव तौर, बंडू आर्दड,मारोती आर्द्ड,बाळराजे आर्दड,कुलदीप आर्द्ड,मुबारक पठाण,यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.