कृषी उत्पन्न बाजार समिती साठी ९५ टक्के मतदान
तीर्थपुरी वार्ताहर
घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज घनसावंगी येथे मतदान पार पडले.एकूण मतदारांपैकी ९५.५० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गेल्या महिनाभरापासून कृषी उत्पन्न बाजार समिती साठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. शिवसेना ठाकरे गटात या निवडणुकीत फूट पडली.हिकमत उढाण यांनी मा.आमदार विलासराव खरात व सतीस घाटगे म्हणजेच भाजपासोबत युती करून ही निवडणूक लढवली तर राष्ट्रवादी चे आमदार राजेश टोपे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी केली. त्यामुळे या निवडणुकीत प्रचारांमध्ये चुरस बघावयास मिळाली.आज झालेल्या मतदानामध्ये सहकारी संस्था एक यामध्ये एकूण ३५० मतदारांपैकी ३४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सहकारी संस्था दोन यात ३६० पैकी ३५० अशा एकूण ७१० पैकी ६९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत तीन व चार या गटांमध्ये एकूण मतदान ८४९ होते यापैकी ८२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. व्यापारी व अडते या मतदारसंघांमध्ये ३०४ मतदारांपैकी २८३ मतदारांनी मतदान केले. हमाल मापाडी मतदार संघात एकूण २६८ पैकी २३८ मतदारांनी मतदान केले. असे एकूण २१३१ मतदारांपैकी २०३५ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ९५.५० अशी आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. या निवडणुकीचा निकाल दिनांक ३० रोजी सायंकाळी पाच वाजता घोषित होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.