विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा
मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -- गोपाळराव बोराडे
मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे गोपाळराव बोराडे
मार्केट कमिटी उपसभापती मंठा श्री गोपाळराव बोराडे यांनी दिनांक पाच तारखेला सरकार विरोधात परतुर येथे ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला आहे सोयाबीनला 6000 भाव देणे कापसाला 12 हजार रुपये भाव देणे मंठा परतूर मतदारसंघातील पिक कर्ज माफ करणे इत्यादी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
मंठा/ प्रतिनिधी :
सन 2023 – 24 मधील प्रलंबित पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, सोयाबीन पिकाला 6 हजार रुपये क्विंटल व कापसाला 12 हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, परतूर – मंठा तालुक्यात अतिवृष्टी झाली असल्याने दोन्ही तालुके ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावे, परतूर – मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण पीक कर्जमाफी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोपाळराव बोराडे यांनी मंठा येथील पत्रकार परिषदेत केले.या वेळी अंकुशराव बोराडे, रोहिदास राठोड यांची उपस्थिती होती.
मोर्चाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मंठा परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023 मधील पिकविमा कंपनी कडून पिक विमा एकूण रकमे पैकी 25% रक्कम ॲग्रीम म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. मात्र उर्वरित 75 टक्के राहिलेला पिक विमा अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेला नसून विमा कंपनी सदरील रकमेचा उपयोग घेत आहे.
वास्तविक यापूर्वीच उर्वरित 75 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा कंपनीने जमा करणे आवश्यक होते. तरी पिक विमा कंपनीने तात्काळ उर्वरित 75 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्या जमा करावी, आज रोजी सर्वत्र महागाई वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाला मात्र जुन्या पेक्षाही कमी दर मिळत आहेत त्यामुळे शासनाने सोयाबीन पिकास 6000 रुपये तर कापूस पिकास 12 हजार रुपये क्विंटल दर द्यावा,
मंठा तालुक्यात सातत्याने कोरडा ओला दुष्काळ पडत असल्याने तसेच चालू हंगामात अतिवृष्टी होऊन सर्व पिके झोपली गेली असल्याने मंठा- परतुर तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, सातत्याने दुष्काळ सापडलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यात यावे,
ई पीक पाहणीची जाचक अट वगळण्यात यावी,तसेच बँकांनी शेतकऱ्यांची होल्ड केलेली खाते तात्काळ पूर्ववत करण्यात यावी यासह अनेक मागण्या असल्याचे श्री बोराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या ट्रॅक्टर मोर्चात मंठा,परतूर,नेर,सेवली येथील शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री बोराडे यांनी केले आहे.या वेळी पत्रकार पंडितराव बोराडे, दिनेश जोशी, संतोष दायमा,नागेश कुलकर्णी, बालाजी कुलकर्णी, रंजीत बोराडे,तुकाराम मुळे,रमेश देशपांडे,आसाराम शेळके,मोसिन कुरेशी, वसंतराव राऊत यांच्यासह विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.