राजा टाकळी येथे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लाल बावटा शेतमजूर युनियनचे साखळी उपोषण सुरू

कुंभार पिंपळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या गोदावरी नदीच्या पूरामुळे राजा टाकळी परिसरातील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना सरकारकडून केवळ 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असली तरी ही मदत अत्यंत अपुरी असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी तसेच प्रति कुटुंब किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करत आजपासून लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने राजा टाकळी येथील गोदावरी नदीकाठी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
भोई समाजातील नागरिकांचे घर व मासेमारीचे साहित्य पूर्णपणे पाण्यात वाहून गेले असल्याने त्यांना स्वतंत्र आर्थिक मदत द्यावी, अशीही या वेळी मागणी करण्यात आली. पूरग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा गोविंद आर्दड, सखाराम हिवाळे, धुराजी हिवाळे ,अभिमान हिवाळे, भीमा कचरे, संदीप खरात, उमेश मुंदडा रवी राक्षे यांनी दिला आहे.



