जालना जिल्हा

गोदावरीच्या प्रकोपाची भीती कायम : शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचेही अतोनात नुकसान

शाळा, घरांसह दुकानांची साफसफाई


घनसावंगी : जायकवाडी प्रकल्पातून तीन लाख क्यूसेकहून अधिक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले हाेते. त्यामुळे गत तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यातील भादली, राजा टाकळी, गुंज, शिवनगावसह उक्कडगाव व इतर गावे पाण्याखाली गेली होती. सोमवारपासून पाणी ओसरत असून, गावांतील शाळांसह घरे, दुकानांत झालेला चिखल बाहेर काढण्यासाठी अनेकांची लगबग आहे. आमचा दसरा चिखलात असे म्हणत परिसर स्वच्छतेची कामे केली जात आहेत.

गोदावरी नदीच्या पुरामुळे भादली गावातील ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पाण्यात बुडाले असून, अद्याप गाव पुन्हा सामान्य स्थितीत झालेली नाही. शिवनगाव येथे खंडोबा मंदिर, शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीच्या इमारती पूर्णपणे पाण्याखाली आहेत.

बुधवारी काही प्रमाणात पाणी ओसरू लागले तरीही रस्त्यांवर चिखलाचा थर असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिक्षणव्यवस्थाही अक्षरशः विस्कळीत झाली आहे. शाळा आणि आंगणवाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत. स्वच्छ पिण्याचे पाणी, वीजपुरवठा तसेच दैनंदिन गरजांच्या वस्तूंचा अभाव असून ग्रामस्थांत मोठा आक्रोश आहे. दरम्यान, दरवर्षी पुराचा त्रास सहन करावा लागत असल्याने शासनाने यावर तत्काळ व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी आता पुढे येत आहे.

गावातील लोकांचे जीवन अजूनही विस्कळीत आहे. पाणी ओसरले तरी स्वच्छतेसाठी मोठे प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासनाने तातडीने मदतीसाठी हात पुढे करावा.
शुभम तौर, सरपंच,


गोदावरीच्या पुरामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही नुकसान झाले आहे. शासनाने आता पंचनाम्याचा सोपास्कर बाजूला ठेवून शेतकरी, नुकसानग्रस्तांना मदत करावी.

किशोर आर्दड, ग्रामस्थ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!