जांबसमर्थ येथील सिंडीकेट बँकेचे निराधार लाभार्थीं अद्यापपर्यंत अनुदानाच्या प्रतीक्षेत!
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थीं हे मागील सहा ते सात महिन्यांपासून अनूदानापासून वंचित होते.वंचित घटकांतील लाभार्थींचे सण उत्सव उत्साहात साजरा व्हावा,म्हणून मध्यांतरी तहसील प्रशासनाकडून तीन महिन्यांचे अनुदान बँकेकडे वर्ग करण्यात आलेले आहे. कुंभार पिंपळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक,या बँकेकडून हे अनुदान वाटप करण्यात आला आहे.
मात्र जांबसमर्थ येथील सिंडीकेट बँकेत निराधार लाभार्थींचे अनुदान प्राप्त असुन सुद्धा, हे अनूदान लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत जमा करण्यात आलेला नाही.त्यामुळे निराधार लाभार्थ्यांकडून बँक विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.प्रत्येक वेळेस लाभार्थ्यांना अनुदाना साठी वेठीस धरले जात असल्याचे प्रकार दिसत आहे.
लाभार्थी हे सातत्याने बँकेच्या पायऱ्या झिजवत आहे.त्यामुळे त्यांना आर्थिक,व मानसिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना अनुदानाच्या रक्कमे बाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.या बँकेला प्रशासनाचा वचक नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.