जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना अटक , बँकेच्या कर्मचाऱ्यानेच दिली होती टीप
जालना/प्रतिनिधी
जालना तालुक्यातील गोलापांगरी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे . 26 नोव्हेंबर रोजी शाखाधिकारी सुभाष गोडबोले हे बँकेतून शेतकरी अनुदानाची आलेली रक्कम वाटप करण्यासाठी गोलापांगरी येथील जिल्हा मध्यवर्ती शाखेत स्कुटीवर 15 लाख रुपये घेवून जात होते . जालना – अंबड रोडवरील गोलापांगरी शिवारातील इंग्लिश स्कूलसमोर सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी टॉमीने मारहाण करुन व धारदार शस्त्राचा धाक दाखवून पैश्यांची बॅग पळवून नेली होती . या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात कलम 394 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
घटनास्थळी पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांनी भेट देऊन पोलिसांना आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचे निर्देश दिले होते . स्थानिक गुन्हे शाखेतील दोन वेगवेगळे पथके तैनात केली . सफाई कर्मचारी सुदर्शन कमाने याने मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेतून दररोज मोठ्या प्रमाणात नगदी रक्कम बँक मॅनेजर हे गोलापांगरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत घेवून जात असल्याची माहिती मित्र शत्रुघ्न उर्फ बबन गायकवाड ( रा . सारवाडी ता . जि . जालना ) यास दिली . दोघांनी संगनमत करून इतर आरोपींच्या मदतीने गुन्हा केला
पोलिसांनी सुदर्शन कमाने व शत्रुघ्न उर्फ बबन गायकवाडला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली . शत्रुघ्न याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र रेकॉर्डवरील आरोपी गजानन सोपान शिंगाडे ( रा . पाचनवडगाव ता . जि . जालना ) , करणसिंग छगनसिंग भोंड , अर्जुनसिंग छगनसिंग भोंड , कनवरसिंग छगनसिंग भोंड ( तिन्ही रा . लोधी मोहल्ला जालना ) , सुनिल उर्फ ताला वैजीनाथ भुतेकर ( रा . लोधी मोहल्ला , जालना ) यांच्या मदतीने केल्याचे कबूल केले . पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला . तसेच रेकी करुन यापूर्वी दोन वेळा रक्कम लुटण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले
पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 20 हजार रुपये नगद व गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकली असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . गुन्ह्यातील उर्वरित रक्कम हस्तगत करण्याची कार्यवाही चालू आहे . सदर सातही आरोपींना पुढील कार्यवाहीस्तव तालुका जालना पोलीस ठाण्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा तपास तालुका जालना पोलीस करीत आहेत .