मराठवाड्यात शिवसेनेची संघटना बांधणी मजबूत करणार-माजीमंत्री खोतकर
न्यूज जालना/प्रतिनिधी
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जनमानसात प्रतिमा उंचावणे, संघटनेच्या बांधणीसाठी दौरे करणे, गावोगाव शाखा स्थापन करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची ताकद निर्माण करणे तसेच मराठवाड्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आदी विविध विषयावर मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक आज उपनेते अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली जालना येथे पार पडली. भाग्यनगर येथील संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत प्रारंभी उपनेते अर्जुन खोतकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, पक्षाचे नेते, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निर्देशावरून ही मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठवाडा हा आपल्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु नव्या राजकीय परिस्थितीत आपल्याला मराठवाड्यात संघटना बांधणी अधिक बळकट करावी लागणार आहे. गावोगाव शाखा स्थापन करणे, त्यासाठी सर्वांना दौरे करावे लागतील. पक्षाचे चिन्ह घरोघर पोहोचावे लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवून द्यावे लागणार आहे. संघटना मजबुतीसाठी कार्यकर्त्यांना- पदाधिकाऱ्यांना बळ द्यावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे कृतिशील, कार्यक्षम आणि अठरा अठरा तास काम करतात. परंतु त्यांची तशी प्रतिमा आपल्याला आता जनमानसात उंचवावी लागणार आहे. जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे, जनतेचे छोटे छोटे प्रश्न जाणून घ्यावे लागतील. तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थानिक प्रश्न आणि मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रकल्प राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्हाप्रमुखांच्या, संपर्कप्रमुखांच्या तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. आपला मुख्यमंत्री आपले सरकार असल्याने जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यासाठी एकत्रित आणि एकदिलाने प्रयत्न करावे लागतील. लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कानावर सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना आणि बैठकीत व्यक्त झालेल्या मागण्यांबाबत माहिती देण्यात येईल. तसेच थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी वेळ मागितला जाईल. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुखांनी आपापल्या स्तरावरील महत्त्वाच्या मागण्या आणि मुद्दे उपस्थित केले. तसेच पक्ष बळकटीसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. मराठवाड्यात पक्षविस्ताराच्या दृष्टीने उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली ताकदीनिशी प्रयत्न करू, असे जिल्हाप्रमुखांनी यावेळी स्पष्ट केले. संघटना मजबुतीसाठी या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली. सुरुवातीला सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखाचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख माजी खासदार सुरेशराव जाधव परभणी, माजी आमदार हरिभाऊ लहाने सेलू, युवासेना कार्यकारणी सदस्य अभिमन्यू अर्जुनराव खोतकर, बळवंत जाधव जिल्हाप्रमुख लातूर, गोपाल माने जिल्हाप्रमुख लातूर, सचिन मुळूक जिल्हाप्रमुख बीड, कुंडलिक खांडे जिल्हाप्रमुख बीड, राजेंद्र जंजाळ जिल्हाप्रमुख छत्रपती संभाजीनगर, आनंद बोंढारकर जिल्हाप्रमुख नांदेड, भास्कर लंगोटे सह संपर्कप्रमुख परभणी, केशव कदम उपजिल्हाप्रमुख परभणी, पंडीत भुतेकर संपर्कप्रमुख जालना, भाऊसाहेब घुगे जिल्हाप्रमुख जालना, मोहन अग्रवाल जालना व संतोष मोहिते तालुकाप्रमुख जालना यांच्या सह आदि उपस्थित होते.