माेक्षप्राप्तीसाठी श्रीरामांचा जप अत्यावश्यक – माजी न्यायाधीश विजय पाटणूरकर
श्रीराम याग साेहळा उत्साहात; पंचक्राेशीतील नागरिकांनी साेहळ्याचा लाभ घेतला
श्रीराम नामाने अवघी जांब नगरी दुमदुमली
जालना । प्रतिनिधी
श्रीराम प्रभू भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदू आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणात रामाच नाव काेरलेले आहे. रामरंगी सगळे रंगले आहेत. राम आहेत म्हणूनच भारतीय जनतेत राम आहे. माेक्षप्राप्तीसाठी श्रीरामांचा जप अत्यावश्यक असल्याचे मत माजी न्यायाधिश विजय पाटणूरकर यांनी श्रीसमर्थ मंदिर जांबसमर्थ येथे आयाेजित श्रीराम याग साेहळ्यात व्यक्त केले.
श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी मंदिरात शनिवार दि.24 डिसेंबर राेजी भव्य श्रीराम यागाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी पंचक्राेशीतील नागरिकांची या साेहळ्यास उपस्थिती हाेती. काही दिवसांपूर्वी श्रीराम मंदिर येथील मुर्त्यांची चाेरी झाली हाेती. त्या मुर्तींची नुकतीच पुनःस्थापना साेहळा संपन्न झाला हाेता. त्याच पार्श्वभूमीवर या श्रीराम याग साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी सकाळी 8 ते 9 पुण्याहवाचन व गणपती अभिषेक, सकाळी 9 ते 10 मातृकापूजन, नांदिश्राद्ध, सकाळी 10 ते 11 वास्तुपूजन, क्षेत्रपालन पुजन, नवग्रह स्थापना, सकाळी 11.30 ते दु.1 ईषान्य कलश स्थापना, कुंडपूजन, अग्नि स्थापना, दु.1 ते 1.30 मुख्य हवन (श्रीराम नाम मंत्र घाेष) व दुपारी 2 ते 4 पुर्णाहुती, आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. यावेळी समर्थ रामदास स्वामी संस्थानच्यावतीने माजी न्यायाधिश विजय पाटनूरकर व भीमराव जाेशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समर्थ वंशज भूषण स्वामी यांनी पाठवलेले शुभेच्छा संदेशाचे पत्रक देण्यात आले.
सामाजिक, काैटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहूनही पुरूष ’उत्तम’ कसा हाेऊ शकताे. याची प्रचिती आपल्याला ’मर्यादा पुरूषाेत्तम रामाच्या’ जीवनामुळे येते. मानव महत्त्वाकांक्षा आणि आदर्श डाेळ्यासमाेर ठेवून आपली प्रगती करू शकताे. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा साेडली नाही म्हणून त्यांना ’मर्यादा पुरूषाेत्तम’ असे म्हटले जात असल्याचे श्री पाटणूरकर यांनी यावेळी सांगितले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जांबसमर्थ येथील समर्थ मंदिर, राम मंदिर तसेच जांबसमर्थ येथील गावक-यांनी परिश्रम घेतले.