येथे पतीला घ्यावे लागते पत्नीचे दर्शन; जांब समर्थातील ४०० वर्षांची प्रथा आजही कायम

दिगंबर गुजर
कुंभार पिंपळगाव : श्री क्षेत्र जांबसमर्थ (ता. घनसावंगी) येथील श्रीराम मंदिरात एक आगळीवेगळी आणि आदर्श परंपरा आजही जपली जात आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या नवदाम्पत्यांपैकी वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. स्त्रीला ‘आदिमाया शक्ती’चा दर्जा देणारी ही परंपरा गेल्या ४०० वर्षांपासून अविरत सुरू आहे. राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींच्या जन्मापूर्वीचे हे मंदिर असून, येथील मूर्तींची मांडणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सामान्यतः श्रीराम मंदिरात सीतामाता रामाच्या डाव्या बाजूला असते, परंतु जांब समर्थ येथील मंदिरात सीतामातेची मूर्ती रामाच्या उजव्या बाजूला आहे. येथे स्त्री शक्तीला सर्वोच्च स्थान देण्यात आल्याने, लग्नानंतर दर्शनास येणाऱ्या पतीला पत्नीच्या चरणी नतमस्तक व्हावे लागते. या मंदिरात अनेक दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.
समर्थांचे वडील सूर्याजीपंत यांना शके १५२५ मध्ये प्रत्यक्ष सूर्यनारायणाने दिलेले श्रीराम पंचायतन येथे आहे. एकदा रामनवमीच्या उत्सवात पंगतीला तूप कमी पडले होते. त्यावेळी समर्थांनी मंदिरासमोरील विहिरीचे (आड) पाणी काढून ते पंगतीत वाढले, ज्याचे रूपांतर तुपात झाले होते. ती ऐतिहासिक खापराची घागर आजही मंदिरात पाहायला मिळते.
रामप्रभू आणि समर्थांचा अद्भुत योग
समर्थ रामदास स्वामींचा जन्म शके १५३० मध्ये चैत्र शुद्ध नवमीला (रामनवमी) बरोबर रामजन्माच्या वेळी झाला. प्रभू श्रीराम आणि समर्थांची जन्मतिथी व वेळ एकच असण्याचा हा विहंगम योग केवळ याच ठिकाणी पाहायला मिळतो. समर्थांच्या पूर्वजांनीच हे गाव वसविले असून, पिढ्यानपिढ्या कुळकर्णीपणाचे वतन याच घराण्याकडे होते.
प्रेरणास्थान जांब समर्थ
ज्या खोलीत समर्थांचा जन्म झाला, ती जागा शोधून काढून तिथे आता भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मातोश्री राणूबाईंना समर्थांनी याच भूमीत दृष्टी दिली होती. आज हे गाव केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान बनले आहे.



